संकल्प स्वराज्य सिद्धीची लिम्का बुक मध्ये नोंद

0

चाळीसगाव । महाराष्ट्राला खुप मोठा इतिहास लाभला असल्याचे साक्ष हे राज्यातील गडकिल्ले देतात. गडकिल्ल्यावरुन महाराष्ट्राचा विशाल वैभवाची प्रचिती होते. मात्र याचे संवर्धन व संरक्षण करणे अवघड बनले आहे. गडकिल्ल्याच्या सर्वधनासाठी शासनासह विविध संस्था, संघटना सरसावल्या आहे. गडकिल्लाच्या संवर्धनासाठी राज्यभर मोहिम राबविले जात आहे. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संकल्प स्वराज्य सिद्धी मोहिम राबविले. मोहिमेंतर्गत 30 मार्च 2016 रोजी महाराष्ट्रातील 300 गडकिल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम व भगवा ध्वज मोहीम आयोजित करण्यात आली होती.

स्वराज्य स्थापना औचित्य
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मोहिमेची नोंद करण्यात आली आहे. हा दिवस म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. 30 मार्च 1645 या दिवशी 371 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली व प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मनातील रयतेचे राज्य स्थापन केले. याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राने विविध संस्थांच्या मदतीने एकाच दिवशी मोहिम राबविण्यात आली.

शिवभक्तांचा समावेश
स्वराज्याच्या पवित्र अग्निकुंडात प्राणांची आहुती देऊन स्वराज्य कार्यासाठी अतुलनीय पराक्रम गाजवणार्‍या मावळ्यांना मानवंदना देण्यात आली. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई अकोला, अमरावती या जिल्ह्यातील किल्ल्यांवर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये एकूण 1350 शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झाले होते.

यांनी केले नियोजन
गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शासनाला मोठे महसूल मिळत आहे. पर्यटनासाठी आलेल्यांमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. त्यासाठी या उपक्रमाची गरज होती. उपक्रमाची संकल्पना संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी सुचविली. गणेश रघुवीर, निलेश जेजुरकर, प्रविण शिर्के, गौरव शेवाळे सचिन शेंडगे, गणेश खुटवड, कैलास ओव्हळकर, रोहित देशमुख, विजय ताकमोगे, दिलीप घोरपडे, शंकर शिंदे, दिलीप सोनवणे, राज बलशेटवार आदींने मोहिमेचे नियोजन केले.

यांचा होता सहभाग: सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संकल्प स्वराज्य सिध्दी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत राज्यातील विविध संस्था, संघटनांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सोबत ह्या मोहिमेत शिवशक्ती प्रतिष्ठान कोल्हापूर, जगदंबा ग्रुप चाळीसगाव, राजमाता प्रतिष्ठान बार्शी, मावळा प्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान ह्या संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या मदतीने मोहिम यशस्वी झाली.

स्वच्छता मोहीम
शासन पर्यटन स्थळांना वाव देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नुकतेच अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा स्मारक बांधण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्याचबरोबर गड किल्ले संवर्धन करणे देखील आज जिकीरीचे बनले आहे. पर्यटकांकडून गड किल्ल्यांवर अस्वच्छता पसरविली जाते. अस्वच्छतेमुळे व दुर्गधीयुक्त वातावरणामुळे पर्यटन स्थळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.