संगकाराची प्रथम श्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्ती

0

कोलंबो । श्रीलंकन क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्वाचा खेळाडून दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. सप्टेंबर, 2017 मध्ये होणारी कौंटी क्रिकेट स्पर्धा ही आपली अखेरची स्पर्धा असणार असल्याचे संगकाराने जाहीर केले. संगकाराने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 39 वर्षीय संगकारा कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाचा महत्वपूर्ण भाग आहे. अनेक सामन्यात शानदार खेळी साकारत संगकाराने सरेच्या संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मंगळवारी मात्र संगकाराने कौंटी क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा करताना प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करत असल्याचे सांगितले. सप्टेंबरमध्ये सरे संघाकडून लॉर्ड्सवर शेवटचा सामना खेळणार असल्याचेही तो पुढे म्हणाला.

कर्णधार म्हणून गाजवला काळ
माजी यष्टीरक्षक व दिग्गज फलंदाज असलेल्या संगकाराचे श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मोठे योगदान राहिले आहे. 2015 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळत होता. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये संगकाराच्या खात्यावर 60 शतकांची नोंद आहे. श्रीलंकेतर्फे खेळताना त्याने वनडे व कसोटीत 12 हजारहून धावा फटकावल्या आहेत. संगकाराने 134 कसोटी, 404 वनडे व 254 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावताना 182 झेल कसोटीत, 402 झेल वनडेत तर 369 झेल प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पकडले आहेत. 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत संगकाराच्या नेतृत्वाखालील लंकन संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, संगकाराने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. काही कालावधीनंतर वनडे व कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर लंकेच्या या दिग्गज फलंदाजाने मंगळवारी प्रथमश्रेणी क्रिकेटला अलविदा केला आहे.