पुणे । झपाट्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकशास्त्रातही अनेक बदल घडत आहेत. आतापर्यंत समस्या सोडविण्यासाठी, रूग्णावर उपचार करण्यासाठी होत असलेला तंत्रज्ञानाचा वापर आता आजारांचे परिणाम आणि समस्या जाणून घेण्यासाठी होत आहे. मधुमेहासाठी कारणीभूत घटकांची रचना त्यांची गणिती आकडेमोड सोडविण्यासाठी मोठी मदत मिळते. यामुळे आगामी काळात संगणकामुळे मधुमेह बरा होण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) येथील शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवतंत्रज्ञान विषयावरील विज्ञान कट्टा कार्यक्रमात डॉ. वाटवे संगणक मधुमेह बरा करू शकतो का?” या विषयावर बोलत होते. परिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी, सचिव अ. पा. देशपांडे, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, विज्ञानशोधिका केंद्राच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर आणि भाग्यश्री लताड याप्रसंगी उपस्थित होते.
’नेटवर्क मॉडेल’चा वापर
मधुमेहाच्या प्रकारात, साखर आणि इन्सुलिनखेरीज किमान सत्तर प्रकारचे घटक असतात. महत्त्वाचे म्हणजे 70-80 घटक आणि त्यांच्यातल्या 350 हून अधिक प्रक्रिया आहेत. या जटील प्रक्रिया अभ्यासण्यासाठी संगणकाची मदत होते, असे डॉ. वाटवे यांनी सांगितले. ’नेटवर्क मॉडेल’ नावाच्या पद्धतीचा उपयोग करून आम्ही आजपर्यंत शोधल्या गेलेल्या सुमारे 350 प्रक्रिया एकत्र केल्या. संगणकाद्वारे या रेणूंचे, जाळे, त्यांचे कार्य अणि परिणाम आणि यामधील गणिती आकडेमोड योग्यप्रकारे समजून घेता येते. याद्वारे मधुमेहावर उपाय शोधणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
व्यायाम महत्त्वाचा
उत्तम आहार आणि नियमित व्यायाम मधुमेह रोखण्यावर आणि नियंत्रित करण्यावर महत्वाचा उपाय आहे, असेही डॉ. वाटवे यांनी नमूद केले. प्रा यशवंत घारपुरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. भाग्यश्री लताड यांनी आभार मानले.