संगणकीकरणाचे काम पुर्णत्वाकडे

0

भुसावळ । सातबारा शेतकर्‍यांना ऑनलाईन उपलब्ध व्हावा यासाठी तहसिल प्रशासनातर्फे वेगाने कामे सुरु आहेत़ यात अद्यापपावेतो संगणकीकरण व ई-फेरफारची 95 टक्के काम पूर्ण झाले आह़े सातबार्‍यामध्ये अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी चावडी वाचन मोहिम राबविण्यात येणार असून अचुकतेवर शिक्कामोर्तब झाल्यावर खातेदारांना बसल्या जागी ऑनलाईन पध्दतीने सातबारा मिळणार आह़े. विशेष म्हणजे भुसावळ तालुक्यात 54 गावांचा कारभार 17 तलाठ्यांकडे असूनही कमीत कमी दिवसात सातबारा नोंदणीचे कामे पूर्णत्वाकडे आले आहे.

रविवारी सुटी असतानांही केले जातेय काम
तालुक्यातील सातबारा उतारे संगणीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे. यापूर्वी 10 टक्के काम होते. मात्र तलाठ्यांकडून सुटीच्या दिवशीही ऑनलाईन नोंदीचे कामे केली जात असल्यामुळे ते आता 95 टक्क्यांवर आले आहे. 15 दिवसात संपुर्ण 100 टक्के काम पुर्ण होणार आहे. तालुक्यातील 54 गावांमध्ये एकूण 90 हजाराच्या जवळपास सर्व्हे क्रमांक आहेत. 94 टक्के म्हणजेच 84 हजार 600 उतार्‍यांचे काम पुर्ण झाले आहे. 54 गावांपैकी 47 गावांमध्ये 45 टकक्यांवर संगणकीकरणाचे काम झाले आहे. तर 34 गावांमध्ये 98 टक्के काम झाले आहे. यात भुसावळ शहर हद्दीत येणारे सतारे येथे 6 हजार उतारे असून 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. कंडारी येथेही 6 हजार उतार्‍यांपैकी 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.

चावडी वाचन मोहिम
ई-प्रणाली व ई-चावडी प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बिनचूक सातबारा उतार्‍यासाठी चावडी वाचन मोहीम राबविण्यात येत आह़े यात खातेदारांनी सातबार्‍याची संकेतस्थळावरून खातरजमा करणे, ऑनलाईन पूर्ण झालेल्या सातबार्‍यातील चुका दुरुस्त करुन चावडी वाचनातून खातेदारांचे आक्षेपांची नोंद घेणे तसेच चावडी वाचनानंतर तपासणीअंती डिजिटल स्वाक्षरीने सातबारा वितरणासाठी योग्य मानला जाणार आह़े. यासाठी निवासी नायब तहसिलदार संजय तायडे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, मंडळाधिकारी एस.पी. पाटील, तालुकाध्यक्ष बी.आर. बारी हे परिश्रम घेत आहे. नोंदणीचे काम लवकरात लवकर पुर्ण होण्याच्या दृष्टीने सुट्यांच्या दिवशीही संगणकावर नोंदणी केली जात आहे.

सातबारा संगणकीरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण केले जात आहे. आतापर्यंत 95 टक्के काम झाले असून येत्या 15 दिवसात पूर्ण 100 टक्के काम केले जाईल. यामुळे खातेधारकांनाही आपले दाखले ऑनलाईन काढणे सोयीचे होणार आहे. यासाठी तलाठी, मंडळाधिकारी यांचे सहकार्य घेतले जात आहे. अचूक काम करण्याकडे आमचे लक्ष आहे.
– संजय तायडे, निवासी नायब तहसिलदार

तीन महिन्यापूर्वी सातबारा उतारे संगणकीकरणाचे काम हे केवळ 10 टक्क्यांवर होते. मात्र हातची कामे पूर्ण करुन सुटीच्या दिवशी सुध्दा कामावर येऊन ऑनलाईन नोंदणीचे काम केले जात आहे. यामुळे खातेधारकांच्या अडचणी देखील दूर होणार आहे.
– एन.आर. ठाकूर, जिल्हाध्यक्ष तलाठी संघटना