सांगवी : गाडीला कट मारल्याचा कारणावरून दोन तरुणांनी संगणक अभियंत्याचा पाठलाग केला. त्याच्या सोसायटीपर्यंत येऊन त्याला दम दिला. दोन तरुण आणि संगणक अभियंता यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादानंतर काही वेळेत संगणक अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे घडली. शिवकांत मिरकले (वय 38, रा. पिंपळे सौदागर) अस मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिवकांत आणि त्यांची पत्नी अनुपमा हिंजवडीमधील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होते. मंगळवारी रात्री उशिरा शिवकांत त्यांच्या कारमधून हिंजवडीहून पिंपळे सौदागर येथे येत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास रस्त्यात त्यांच्याकडून दुसर्या कारला कट बसला. दुसर्या कारमधील दोन तरुण शिवकांत यांच्या सोसायटी पर्यंत त्यांचा पाठलाग करत आले. सोसायटीच्या गेटवर त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले. शिवकांत यांनी गाडीच्या डिकीमधून दांडके काढत तर दोन तरुणांनी हॉकी स्टिक काढत एकमेकांना दम दिला. यानंतर शिवकांत सोसायटीच्या पार्किंगमध्ये निघून गेले. तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत. शिवकांत पहिल्या मजल्यावर गेले. त्यानंतर काही क्षणात पहिल्या मजल्यावरून शिवकांत खाली पडले. ते धापा टाकत असल्याचे त्यांच्या शेजारी राहणार्यांनी पाहिले. त्यावरून शेजार्यांनी त्यांना उठवून बसवले. काही वेळाने शिवकांत यांना त्यांच्या घरात सोडले. त्यांच्या चेहर्यावर जखमा झाल्या होत्या. तब्बेत बरी नसल्याचे पत्नीला सांगत पहाटे एकच्या सुमारास प्राण सोडले. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत