जळगाव। जिल्हा सरकारी वकील कार्यालयात सुरु झालेली संगणक प्रणाली राज्यात ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून पुढे यावी. राज्यात असा प्रयोग कुठेच झालेला नाही, त्यामुळे भविष्यात यात आणखी काही तंत्रज्ञान अथवा बाहेरुन मार्गदर्शक बोलावण्याची गरज भासली तर त्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करु अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्या दालनात गुरुवारी दुपारी पालकमंत्र्याच्याहस्ते संगणक प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.ए.लव्हेकर विशेष अतिथी होते. केतन ढाके व तंत्रज्ञ अविनाश पाटील यांनी संगणक प्रणालीची माहिती दिली. हे सॉफ्टवेअर तयार करणार्या अविनाश पाटील यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाला सर्व सरकारी वकील उपस्थित होते.
काय आहे नेमकी प्रणाली
कोर्ट केस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर फॉर डिजीपी या नावाने ही प्रणाली सुरु झाली आहे. या प्रणालीमुळे न्यायालयीन कामकाजाची पेपरलेसकडे वाटचाल सुरु झालेली आहे. नियमित केसेसचा डाटा, केसची सद्यस्थिती, सरकारी वकील व न्यायालयाच्या प्रकरणाची स्थिती, सरकारच्या बाजुने व सरकारच्या विरोधात लागलेले निकाल, दैंनदिन केसेस, कोणत्या न्यायालयात कोणते प्रकरण सुरु आहे याची अद्ययावत माहिती यात राहणार आहे. याशिवाय महत्वाचे कागदपत्रे स्कॅन करुन संगणात फिड करता येते. दर महिन्याचा आढावा ऑनलाईन सादर करता येणार आहे.
लॅनद्वारे एकाचवेळी लाभ
शासनाला दररोजही अचूक माहिती तत्काळ पाठविणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे लॅनच्या सहाय्यातून एकाचवेळी अनेक सरकारी वकीलांना संगणकावर या प्रणालीचा वापर करता येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेत कामकाज करतेवेळी अशी प्रणाली सुरु करणारे जिल्हा सरकारी वकीलांचे राज्यातील पहिले कार्यालय ठरले आहे. त्याचे पालकमंत्र्यांनी कौतुक करुन मुंबईसह बाहेरुन येणार्या तज्ञांबाबत अथवा इतर सुविधांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.