उद्घाटनप्रसंगी केले प्रतिपादन
पिंपरी : महाविद्यालयाने विविध उपक्रम राबवावेत या धोरणानुसार हा संगणक साक्षरतावर्ग आयोजित करण्यात आला. संगणक प्रशिक्षण वर्गाला बचतगटातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल या महिलांचे अभिनंदन केले पाहिजे. संगणक साक्षर होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे महिला बचतगटांचे सक्षीकरण होणार आहे. त्यामुळे संगणकाचे प्रशिक्षण घेणे सगळ्यांना जमणार नाही असे वाटून अनेक महिला हे प्रशिक्षण घेण्याचे टाळतात. त्यामुळे याप्रकारचे उपक्रम महाविद्यालयातर्फे महिला बचतगटांसाठी विनामूल्य राबविले जातील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी दिली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये बचतगटांमधील महिलांसाठी आयोजित केलेल्या संगणक साक्षरता वर्गाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्याप्रसंगी डॉ. चासकर बोलत होते.
संगणक वर्गाला शुभेच्छा
याप्रसंगी जिव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा कविता खराडे यांनी महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी संगणक साक्षरता आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्थेकडून अशाप्रकारचे उपक्रम राबविल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. त्याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्या वर्षा जगताप यांनी संगणक साक्षरता वर्गाला प्रवेश घेणार्या वर्गाला शुभेच्छा दिल्या. महिलांनी त्यांच्या व्यवसायात या कौशल्याचा उपयोग क रून घ्यावा असे आवाहन केले. पल्लवी पांढरे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली व त्यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. हा संगणक साक्षरतावर्ग महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.एस.जी.लखदिवे यांनी केले. या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभागातील प्रा.विदुला व्यवहारे व जिव्हाळा या संस्थेच्या अध्यक्षा कविता खराडे यांची मोलाची मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागातील प्रा. सुप्रिया फटांगरे यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख प्रा.विदुला व्यवहारे यांनी करून दिली व आभार प्रदर्शन संगणकशास्त्र विभागातील प्रा. वर्षा इखे यांनी केले. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये संगणकशास्त्र विभागातील प्रा. रेश्मा काटकर यांचे सहकार्य लाभले.