संगीताच्या आकाशातील गानसरस्वती लोपली

0

मुंबई : मंत्रमुग्ध करणाऱ्या तानांनी संगीतप्रेमींना तल्लीन करणारा पद्मविभूषण, पद्मभूषण ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा भावमधुर आवाज शांत झाला. सोमवारी रात्री प्रभादेवी येथील राहत्या घरी किशोरी आमोणकर (८४) यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्या पश्चात मुले, सुना आणि नातवंडे असा परीवार आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत रविंद्र नाट्य मंदिर येथे किशोरी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

१० एप्रिल १९३१ला जन्मलेल्या किशोरीताईंचा अवघ्या आठवड्याने वाढदिवस होता, पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आई गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या कडक शिस्तीत बालपणापासूनच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचं बाळकडू पाजलं गेलं. बालवयातच वडीलांचं छत्र हरपल्यानंतर आईच्याच छत्रछायेखाली वाढलेल्या किशोरीताईंनी त्यांच्याकडूनच भारतीय शास्त्रीय संगीताचे बारकावे शिकले. आई, गुरू आणि परिक्षक अशा तिहेरी भूमिकेत मोगूबाई यांनी किशोरीताईंना घडवण्याचं काम केलं. पुढे त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याची गायकी आत्मसात केली. स्वत:चे नवनवीन प्रयोग करीत त्यांनी जयपूर घराण्याची गायकी शिखरावर पोहोचवण्याचे काम केले आणि भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थानी विराजमान झाल्या. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांसोबत संगीत नाटक अकादमी, संगीत सम्राज्ञी, संगीत संशोधन अकादमी, संगीत नाटक अकादमी फेलोशिप या पुरस्कारांनी किशोरीताईंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच सुगम संगीतातही त्या पारंगत होत्या. ‘अवघा रंग एक झाला’ या त्यांच्या आवाजातील भजनाने अपार लोकप्रियता मिळवली. केवळ शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतापुरतीच आपली कारकिर्द मर्यादित न ठेवता १९५०मध्ये व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ करीत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘गीत गाया पत्थरों ने’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी प्रथम पार्श्वगायन केले. त्यानंतर जवळजवळ ४० वर्षांनी म्हणजेच १९९१ मध्ये ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटातील गीतांचं संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. गाण्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. श्रोत्यांसमोर गायन सादर करण्यापूर्वी त्या प्रचंड रियाज करायच्या. ताल आणि सूर यांची आत्मक मैफल जमली की मगच त्या श्रोत्यांसमोर यायच्या. याच कारणामुळे श्रोत्यांनाही त्या संगीतातील आत्मानुभव येण्यात यशस्वी व्हायच्या. ख्याल गायकीसोबतच ठुमरीमध्येही त्यांची खासियत होती. भारतीय शास्त्रीय संगीतशास्त्राची माहिती देणारा ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. नात तेजश्री आमोणकरने किशोरीताईंच्या गायनाचा वारसा जपला आहे. किशोरीताईंच्या जाण्याने भारतीय संगीतक्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वच क्षेत्रांमधून व्यक्त केली जात आहे.

मान्यवरांची श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर
महान शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्या निधनाने खूप दु:ख झालं आहे. एका असाधारण गायिकेच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत जगताची खूप मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

शंकर महादेवन
महान गायिका किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं संगीत कायम अजरामर राहिल.

संजीव अभ्यंकर
भारतीय संगीतक्षेत्रातील ध्रुव तारा निखळला. त्यांच्यासोबत कार्यक्रम करणं म्हणजे माझ्यासाठी एक नवी अनुभूती घेणं हाच होता. कोणत्याही कार्यक्रमात रसिकांसमोर जाण्यापूर्वी रियाजाच्या माध्यमातून त्या सरस्वतीची आराधना करायच्या. याच कारणामुळे त्यांच्या कार्यक्रमाला साक्षात सरस्वती उपस्थित असल्याचा अनुभव गायक-संगीतकारांसोबत श्रोत्यांनाही यायचा.

पद्मजा फेणाणी
त्या गोव्याच्या असल्याने मला जेव्हा कधी भेटायच्या तेव्हा कोंकणी भाषेत मला संगीताचा अभ्यास कसा चाललाय असं विचारायच्या. त्यांचा ध्यास, जीवन सारं काही संगीतच होतं. त्यामुळेच जीवनभर त्या संगीतासाठी जगल्या आणि सांगीताच्या रूपात अजरामर झाल्या आहेत.

राहुल देशपांडे
किशोरीताई या जगात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. किती आनंद दिलाय तुम्ही. हे सत्य पचवणं अवघड जात आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
किशोरी आमोणकर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताची कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्याने अतिव दु:ख झालं आहे. त्यांचे कार्य लोकांच्या मनात कायम राहणारं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने प्रयोगशीलता व संवेदना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत. किशोरीताई भावप्रधान गायिका होत्या. गीत किंवा भजन, श्रोत्यांना त्यांनी श्रवणानंदच दिला. येथेच न थांबता संगीतावरील ग्रंथही त्यांनी लिहिला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या आप्त-रसिक चाहत्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो

शरद पवार
किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विशुद्ध सूर हरपला आहे. किशोरीताईंच्या सुरांचा मी एक निःसीम चाहता असल्यामुळे त्यांच्या जाण्याने संगीत रसिकांना झालेल्या दुःखाची व भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीची मला कल्पना आहे.

विनोद तावडे (सांस्कृतिक कार्य मंत्री)
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील तपस्वी गायिका आपण गमावली आहे. किशोरीताई या भारतीय शास्रीय संगीताचं एक अधिष्ठान होत्या. शास्त्रीय संगीताचे सूर रसिकांसमोर उलगडून दाखविण्याचं सामर्थ्य त्यांच्या गायनामध्ये होते. सच्च्या आणि निर्भेळ सुरांवरची श्रद्धा यामुळे गानसरस्वती गायकी अलौकिक बनली. जगभरातल्या श्रोत्यांवर त्यांच्या सुरांनी मोहिनी टाकली होती.