मुंबई – मंत्रमुग्ध करणार्या तानांनी संगीतप्रेमींना तल्लीन करणारा पद्मविभूषण, पद्मभूषण ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा भावमधुर आवाज शांत झाला. सोमवारी रात्री प्रभादेवी येथील राहत्या घरी किशोरी आमोणकर (84) यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बर्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्या पश्चात मुले, सुना आणि नातवंडे असा परीवार आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत रविंद्र नाट्य मंदिर येथे किशोरी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दादरच्या शिवाजीपार्क येथील हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
10 एप्रिल 1931ला जन्मलेल्या किशोरीताईंचा अवघ्या आठवड्याने वाढदिवस होता, पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आई गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या कडक शिस्तीत बालपणापासूनच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे बाळकडू पाजले गेले. बालवयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्याच छत्रछायेखाली वाढलेल्या किशोरीताई त्यांच्याकडूनच भारतीय शास्त्रीय संगीताचे बारकावे शिकल्या. आई, गुरू आणि परिक्षक अशा तिहेरी भूमिकेत मोगूबाई यांनी किशोरीताईंना घडवण्याचे काम केले. पुढे त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याची गायकी आत्मसात केली. स्वत:चे नवनवीन प्रयोग करत त्यांनी जयपूर घराण्याची गायकी शिखरावर पोहोचवण्याचे काम केले आणि भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्या ध्रुव तार्याप्रमाणे अढळ स्थानी विराजमान झाल्या. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांसोबत संगीत नाटक अकादमी, संगीत सम्राज्ञी, संगीत संशोधन अकादमी, संगीत नाटक अकादमी फेलोशिप या पुरस्कारांनी किशोरीताईंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच सुगम संगीतातही त्या पारंगत होत्या. अवघा रंग एक झाला… या त्यांच्या आवाजातील भजनाने अपार लोकप्रियता मिळवली. केवळ शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतापुरतीच आपली कारकिर्द मर्यादित न ठेवता 1950मध्ये व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ करत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. गीत गाया पत्थरों ने… या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी प्रथम पार्श्वगायन केले. त्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी म्हणजेच 1991 मध्ये दृष्टी या हिंदी चित्रपटातील गीतांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. गाण्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. श्रोत्यांसमोर गायन सादर करण्यापूर्वी त्या प्रचंड रियाज करायच्या. ताल आणि सूर यांची आत्मक मैफल जमली की मगच त्या श्रोत्यांसमोर यायच्या. याच कारणामुळे श्रोत्यांनाही त्या संगीतातील आत्मानुभव देण्यात यशस्वी व्हायच्या. ख्याल गायकीसोबतच ठुमरीमध्येही त्यांची खासियत होती. भारतीय शास्त्रीय संगीतशास्त्राची माहिती देणारा स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. नात तेजश्री आमोणकर हिने किशोरीताईंच्या गायनाचा वारसा जपला आहे. किशोरीताईंच्या जाण्याने भारतीय संगीतक्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वच क्षेत्रांमधून व्यक्त केली जात आहे.