संगीतामध्ये विवेक जागृत ठेवण्याची ताकद : विदूर महाजन

0

पुणे । कलेमुळे सकारात्मक दृष्टीकोन जागृत होण्यास हातभार लागतो. जीवनातील चांगल्या-वाईटाचा विचार करण्याचा विवेक जागृत ठेवण्याची ताकद संगीतामध्ये असते, असे मत ज्येष्ठ सतारवादक विदूर महाजन यांनी व्यक्त केले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात आयोजित व्यसनातून व्यासंगाकडे या कार्यक्रमात महाजन बोलत होते.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होत्या. यावेळी विदूर महाजन यांनी सादर केलेल्या यमन रागातील सुरावटींना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्तीसाठी आलेल्या 175 रुग्णमित्रांना संगीत आणि सतार वादनाचा अनोखा अनुभव यावेळी अनुभवता आला.

सतार वादनाचा व्यासंग जोपासल्यामुळे मला माझ्या जीवनाचा आनंद गवसला. सतार वादनातून निर्माण होणार्‍या सकारात्मक वातावरणाची अनुभूती मला नेहमीच प्रेरणादायी ठरली. व्यसनाच्या बिकट वाटेवरून आनंददायी जीवनाकडे वाटचाल करू इच्छिणार्‍यांना सतारसारखे आनंद आणि ऊर्जा निर्माण करणारे वाद्य मार्गदर्शक ठरू शकेल, असा मला विश्वास वाटतो, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. वाईट व्यसनांनी आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा व्यसने ही चांगलीही असतात याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमाने आला. मुक्तांगणमध्ये ट्रिटमेंट घेणार्‍या रुग्णांनी मित्रांनी याचा विचार करावा, असे पुणतांबेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.