बालगंधर्व संगीत रसिक मंडळाची मागणी
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर व्हावी आणि संगीत रंगभूमीचे पुनरुत्थान व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने खंबीरपणे या कलेच्या पाठीमागे उभे रहायला हवे. नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, स्वरराज छोटा गंधर्व आदी दिग्गज कलावंतानी वैभवसंपन्न केलेली संगीत रंगभूमी सध्या विपन्नावस्थेत आहे. तिला पुन्हा बहर येऊ शकेल, असा सध्याचा काळ आहे. त्यामुळे संगीत नाटकांना एक स्वतंत्र विषय समजून महाराष्ट्र शासनाने त्याच्या विकासासाठी दरवर्षीच्या अंदाजपत्रकात भरघोस निधीची तरतूद करावी. यासह संगीत रंगभूमी क्षेत्रातील कलावंतांच्या आणि महाराष्ट्रातील नाट्यसंस्थांच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यापुढे मांडण्यासाठी त्यांची भेट घेण्यात येणार आहे. याविषयी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास मंत्रालयासमोर निदर्शने करण्याशिवाय पर्याय राहाणार नाही, असा इशारा बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी दिला.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मराठी संगीत रंगभूमी पुनरुत्थान चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी यंदाच्या नाट्यसंमेलन अध्यक्षा कीर्ति शिलेदार होत्या.
मंडळाच्या विविध मागण्या
महाराष्ट्र शासनाने मराठी संगीत नाटकांसाठी दरवर्षी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद करावी, संगीत नाटक सादर करणार्या हौशी नाट्यसंस्थांना किमान 25 प्रयोगांसाठी अर्थ सहाय्य करावे, दरवर्षी शासनातर्फे संगीत नाट्यसंमेलन साजरे करावे, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही संगीत नाट्य अकादमी उभी करावी, नवीन संगीत नाटक लिहिणार्या लेखकाला पुस्तक प्रकाशनार्थ अर्थ सहाय्य द्यावे, तरुण कलाकारांच्या नाट्यसंगीत स्पर्धा दरवर्षी आयोजित कराव्यात, ग्रामीण भागात संगीत नाटक सादर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, संगीत नाट्यसंस्थाना दरवर्षी अनुदान द्यावे, संगीत नाटक सादर करण्यासाठी नाममात्र दराने रंगमंदीरे उपलब्ध व्हावीत, स्वरराज छोटा गंधर्वांच्या नावाचा पुरस्कार सुरू करावा, या आमच्या प्रमुख मागण्या असल्याचे या चर्चासत्राचे मुख्य आयोजक सुरेश साखवळकर यांनी सांगितले.