संगीत महोत्सवात महेश काळे यांच्या सुरेल गायकीचा स्वरसाज

0

गायक महेश काळे यांचे सादरीकरण

पुणे : आलाप तानांमध्ये गुंफलेल्या बंदिशींच्या, विविध गीतांच्या बहारदार सादरीकरणाने आणि आपल्या कसदार गायकीने गायक महेश काळे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. महेश काळे यांनी सादर केलेल्या गीतांना प्रतिसाद देत रसिकांनी देखील उत्स्फुर्त सहभाग घेतला. संगीत महोत्सवात गायक महेश काळे यांच्या सुरेल गायकीने स्वरसाज चढला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रख्यात गायक महेश काळे यांचा सूर निरागस हो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रसिकांना सुरेल अनुभूती दिली

कार्यक्रमाची सुरुवात मारु-बिहाग रागातील बंदिशीने झाली. मंगेश पाडगावकर यांनी रचलेल्या शब्दावाचुन कळले सारे या गीताच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल अनुभूती दिली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील दिल की तपिश या गीताने रसिकांची मने जिंकली. यानंतर याच चित्रपटातील मन मंदिरा या गीताला रसिकांनी आपल्या मोबाईलच्या प्रकाशाद्वारे दिलखुलास दाद दिली. तसेच गायक महेश काळे यांच्याबरोबर गीतांमध्ये सहभाग घेत गायनाचा आनंद घेतला.
महेश काळे यांना राजेंद्र भावे (व्हायोलिन), राजीव तांबे (हार्मोनियम), प्रसाद जोशी (पखवाज), निखील फाटक (तबला), उद्धव कुंभार (तालवाद्ये) यांनी साथसंगत केली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.