संगीत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग : पं. मोघे

0

सांगवी : ‘मानवी जीवनाचा अविभाज्य भाग संगीत आहे. नादब्रम्हावरच चराचर सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. माणसाच्या मनाला आणि आत्म्याला आकार देवून सर्वोत्तम करण्याचे काम संगीत करते. संगीत मानवी जीवनाचे असे अमृत आहे. जे संगीत प्रेमी माणसाला पुरतही नाही आणि सरतही नाही, असे मत दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पं. उमेश मोघे यांनी व्यक्त केले. प. पु. बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित, श्री दत्त आश्रम येथील श्री दत्त जयंती नाम सप्ताह व संगीतत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

हमीरया, आडाणा, होरी सादर
संगीत महोत्सवाचा प्रारंभ ग्वालीयर व पतियाला घराण्याचे गायक पं. मुकूंद अनंत मराठे यांच्या हमीरया रागाने झाला. त्यांनी हमीर रागातील ’हो छैैयल छबीला, अलबेला’ हा विलंबीत एक तालातील बडा खयाल सादर केला. त्यानंतर ’झांजरीया बाजे’ हा त्रितालातील छोटा खयाल सादर केला. त्यांनी सादर केलेला ‘आडाणा’ रागातील छोटा खयाल व तराणा श्रोत्यांची विषेश पसंती मिळवून गेला. त्यानंतर त्यांनी श्रोत्यांंच्या पसंतीवरून ‘माझे माहेर पंढरी’ आणी कबीरजींच्या काही रचना सादर केल्या. त्यांनी सादर केलेेली ‘कन्हैया घर चलो’ ही होरी विशेष दाद मिळवती झाली. त्यांनी आपल्या संगीत सेवेची सांगता ’भैरवी’रागातील दादराने केली. त्यांना हार्मोनियमसाथ केशव गाडेकर, तबलासाथ सतीश काळे, स्वरमंडल व स्वरसाथ महेश जोशी तर तानपूरासाथ शाहीर गुरूप्रसाद नानीवडेकर यांनी केली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पं. मुकूंद मराठे, पं. राजकुमार बार्शीकर, शाहीर गुरूप्रसाद नानीवडेकर, शंकर महाराज, मधुसुदन पाटील महाराज, वाघ महाराज, देवकर महाराज, बापुसाहेब ढमाले आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले. आभार आश्रमाचे संचालक ह. भ. प. तुकाराम महाराज भाऊ यांनी मानले.