विविध पावसाळी गीतांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली धम्माल
अण्णासाहेब बेंडाळे जन्मशताब्दी वर्षानिमित्त मू.जे.त सांस्कृतीक कार्यक्रम
जळगाव । ढग दाटुनी येतात…अधीर मन झाले..बरसो रे मेघा, मेघा…अशा विविध पावसाळी गीतांनी मू.जे.महाविद्यालयातील दिवस विद्यार्थ्यांनी बहरून टाकला. महाविद्यालयात संगीत विभागातर्फे आनंदयात्री अण्णासाहेब बेंडाळे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सरीवर सर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनावेळी संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे, डॉ.अनिल सरोदे, विभागप्रमुख कपिल शिंगाणे उपस्थित होते.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
यावेळी डॉ.उदय कुलकर्णी म्हणाले की, जीवनात संगीत महत्वाचे आहे. महाविद्यालयीन जीवनात गायनकला आणि वाद्यकला विकसीत करण्यासाठी सरीवर सरी सारख्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलेला वाव मिळेल असेही ते म्हणाले. यावेळी विविध विभागातील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अश्विन सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी आदिंनी परिश्रम घेतले.
संस्कृत भाषेतील गाण्यांचे केले सादरीकरण
कार्यक्रमात अवनीतल पुनवतीर्णी, दिल है छोटासा, छुकर मेरे मन को, आजा सनम मधुर ही संस्कृत भाषेत गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. तर सावन का महिना, राजा ललकारी, ढग दाटुनी येतात, रिमझिम के गीत सावन गाये, आला शहारा गोड शहारा, डिपारी डिपांग अशी गीते सादर झाली. दीक्षा इंगळे, आरती धाडी, सुमित माचरे, मयुरी हरिमकर, राकेश पाटील, रितेश भोई, कामिनी खैरनार, अपेक्षा पाटील, आशुतोष चौधरी, प्रवीण बेलदार यांनी गीते सादर केली. त्यांना हार्मोनियमवर प्रा. कपिल शिंगाणे, ऑक्टोपॅडवर प्रा.देवेंद्र गुरव, ढोलकीवर कृष्णा, सिंथेसायझरवर चेतन भोईटे, तबलावर मयूर पाटील, गिटारवर तेजस पाटील, बासरीवादन राज यांनी साथसंगत केली.