जळगाव। संगीत संशेवकल्लोळ या नाटकाचे कथानक पारंपारिक वळणाचे, कुठल्याही लोकनाट्याला साजेसे आहे म्हटले तर लोककलेच्या परंपरेतले आणि म्हटले तर ब्रेख्त या पाश्चिमात्य नाटककाराच्या नाट्यशैलीतले हे नाटक. आमच्या लहानपणी आमची आजी एक गोष्ट सांगायची, एक असतो राजा आणि एक असते राणी. अगदी तसच या नाटकात आहे. एक भोळा राजा आहे आणि एक चतुरराणी आहे. यांच्यासोबत चलाख प्रधान आहे तर बेरकी शिपाईसुध्दा आहे.
नाटकाचे कथानक पुढे नेण्यासाठी शाहीर आहे आणि नाटकाची खरी नायिका, या सार्या कथानकाला कारणीभूत अशी व्यक्तिरेखा म्हणजे नर्तिका सगुणा होय. जिच्या पायी हे सारे रामायण घडते. अवघ्या सहा पात्रात सामावलेले हे नाटक. गणपतीचे स्तवन करीत लोककला प्रकारातल्या गणाने नाटकाला सुरुवात होते. गणपती आणि रिध्दीसिध्दी नाचून जातात. पाठोपाठ येतात ते कृष्ण आणि पेंद्या. नेहमीप्रमाणे मथुरेच्या बाजाराला जाणार्या गवळणींची वाट पहात आहेत. गवळणी येतात ते मावशीला सोबत घेवून आणि मग विनोदाची आतषबाजी होते. या गवळणीत केवळ पौराणिक संदर्भावरच नाही तर सामाजिक, राजकीय सर्वच स्तरावर फटकेबाजी होते. आजच्या परिस्थितीवर चिमट्या काढणारे, बोचकारे काढणारे संवाद घडून येतात. शेवटी कन्हैय्याविषयी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गवळणी नृत्य, गीताचा अविष्कार करतात.