नवी दिल्ली । बीसीसीआय सध्या संकटाच्या घेर्यात सापडले आहे. अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या समितीने (सीओए) लवकरात लवकर संघ निवड करण्याचे निर्देश दिले आहेत.
सीओएने यासंदर्भात बीसीसीआयला आधीही सूचना केली होती. संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना पाठविण्यात आलेल्या सात सूचनांच्या पत्रात कठोर शब्दांत कान उपटण्यात आले. आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलमध्ये मोठा वाटा मिळावा यासाठी दबावतंत्राचा वापर म्हणून जगातील सर्वांत श्रीमंत मानल्या जणार्या बीसीसीआयने संघ पाठविण्याची 25 एप्रिल ही अंतिम तारीख होती. आयसीसीने बीसीसीआयचा वाटा 57 लाख डॉलरवरून कमी करून 29.3 लाख डॉलरवर आणल्याच्या कारणावरून बीसीसीआय नाराज आहे.
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळावे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वादात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. यावर चिंता व्यक्त करताना अनेक माजी खेळाडूंनी या स्पर्धेत संघाने सहभागी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह इतर काही भारतीय माजी क्रिकेटपटू भारतीने संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायला हवे या पक्षात असलेल्या 12 माजी क्रिकेटपटूंमध्ये सचिन आणि द्रविड यांचाही समावेश आहे.
निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयला सीओएने पाठविलेल्या ई-मेलमध्ये संघ निवड टाळल्यामुळे बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे सूचित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संघ पाठविण्याची अखेरची तारीख 25 एप्रिल होती, पण संघाची अद्याप निवड झाली नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. निवड समितीची त्वरित बैठक बोलवून संघ निवडा. नंतर यादी आयसीसीला सोपविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. भारतीय संघ जगात सर्वोत्कृष्ट आहे, हे लक्षात असू द्या. स्पर्धेतून माघार घेण्याआधी याचा विचार करा. बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होऊ देण्याऐवजी टीम इंडियाच्या भल्यासाठी काम करा. खेळाडूंचे हित सर्वतोपरी असल्याचे भान ठेवा, असेही सीओएने पत्रात म्हटले आहे.
दिग्गज म्हणतात खेळा!
तेंडुलकर, द्रविड यांच्यासह झहीर खान, गुंडप्पा विश्वनाथ, संदीप पाटील, संजय मांजरेकर, आकाश चोप्रा, अजित आगरकर, व्यंकटेश प्रसाद, सबा करीम, मुरली कार्तिक आणि दीप दासगुप्ता या माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायला हवे, अशी भावना व्यक्त केली आहे. टीम इंडियाने आपले गतविजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं या माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे.