संघर्षमय जीवन जगणार्‍या माता भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्शवत

0

गरीबीत जीवन जगून पिढ्यांसमोर आदर्श निर्माण करणार्‍यांची परपंपरा जोपासावी -जनार्दन महाराज

फैजपूर- संस्कारक्षम व देशासाठी राष्ट्रभक्त घडवावेत, असे आवाहन करीत महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, समाजातील अशिक्षित मातांनी जीवनात खूप काबाडकष्ट, मेहनत करून आणि सचोटीने वागून सुशिक्षित-सुसंस्कारित पिढी निर्माण केली. स्वत: अत्यंत गरीबी, हालअपेष्टांचे संघर्षमय जीवन जगून भविष्यातील पिढ्यांसमोर आदर्श निर्माण केला. अशीच परंपरा येणार्‍या पिढीने निर्माण करावी, असे विचार त्यांनी येथे व्यक्त केले. मातृहृदयी साने गुरुजी जयंतीचे औचित्य साधून मधूर संस्कार केंद्राने 24 डिसेंबरला सकाळी 9.30 वाजता समाजातील मातृशक्तीचा गौरव केला. गेल्या 16 वर्षांपासून या कार्यक्रमाचे अखंडीत आयोजन सुरू असून यंदाच्या 17व्या मातृवंदना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन महाराज होते.

यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ.व्ही.जे.वारके व धरणगाव येथील समाजसेविका प्रा.राखी पाटील, कथा कथनकार व.पु.होले उपस्थित होते. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित निष्कलंक धाम वढोदे प्र. सावदा येथे झालेल्या कार्यक्रमात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पतीची साथ नसताना संस्कारक्षम पिढी घडवणार्‍या नऊ मातांचा प्रतिकात्मक स्वरुपात गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन निर्मल चतुर व मनीषा चौधरी, तर आभार बी.एन.पाटील यांनी मानले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व मधूर संस्कार केंद्राचे व्ही.ओ.चौधरी, निर्माण चतुर यांनी परिश्रम घेतले.

या मातांचा झाला सत्कार
शकुंतला ठाकूर वाघुळदे (बामणोद), जिजाबाई प्रभाकर मोरे (यावल), विद्या सुधाकरसिंग शिसोदिया (पिंपळगाव), पुष्पा हरी चौधरी (फैजपूर, ह.मु.नाशिक), कुसुम श्रीधर पाटील (आळंदी देवाची), जमुना नथमल परमार (धडगाव), शांतीबाई चिमा हुरेज (पालखा), जयवंताबाई बालू पाटील (लाख्खारी), वत्सला बद्रीनाथ बेळे (नाशिक) या नऊ मातांचा सन्मान करण्यात आला.

मातांचा सन्मान हा चांगुलपणाचा गौरव -डॉ.व्ही.जे.वारके
गरीबी किंवा परिस्थितीचा बाऊ न करता आलेल्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाणार्‍या मातांचा सन्मान करणे म्हणजेच चांगुलपणाला बळ देण्यासारखे आहे. यामुळे संस्कारक्षम पिढी घडवणार्‍या हातांना नक्कीच बळ मिळेल. या कार्यक्रमात सहभागी संधी मिळणे आनंददायी आहे. मातांच्या डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू या कार्यक्रमाचे फलित आहे, असे सावदा येथील डॉ.व्ही.जे.वारके म्हणाले.