संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सिंदखेडराजा येथून

0

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात येत असंल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा शनिवार म्हणजे १५ एप्रिलपासून बुलडाण्याच्या सिदखेडराजा येथून सुरू होत आहे.

सिंदखेडराजा येथून सुरू होणारी ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून १८ एप्रिलला शहापूर येथे या टप्प्याचा समारोप होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकनपार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी पक्ष यात सहभागी होत आहेत. भारतीय जसनता पार्टी-शिवसेना युती सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यात आलेले अपयश, कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

याआधी याच कारणांसाठी विरोधी पक्षांनी संघर्षयात्रेचा पहिला टप्पा ऐन विधिमंडळाच्या अधिवेशनात २९ मार्चपासून चार एप्रिल या काळात केला होता. चंद्रपूर ते पनवेल, अशी ही यात्रा होती. याच संघर्षयात्रेचे आणखी दोन टप्पे काढण्यात येणार आहेत. या यात्रेमध्ये विरोधी पक्षांचे राज्यातील सर्व प्रमुख नेते व आमदार सहभागी होणार आहेत.