मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या तसेच सत्तेतल्या शिवसेनेच्या विविध यात्रावर उतारा म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे येत्या २५ तारखेपासून चार दिवसांची संवादयात्रा काढली जाणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, एम.आय.एम., पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधम्यासाठी तसेच त्यांच्या कर्जमाफीसाठी अलीकडेच संघर्षयात्रेचे तीन टप्पे केले. चौता टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यातच अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी याच विषयावर आसूड यात्रा काढली. स्वाभामानी शेतकरी संघटनेतर्फे आत्मक्लेश यात्रा काढली जाणार आहे तर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून संवाद यात्रा काढली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपातर्फे राज्यभर २५ ते २८ मे, अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद– पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत.
राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे या शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत. या संवाद उपक्रमात पहिल्या दिवशी गुरूवार, २५ मे रोजी एकाच दिवशी १६ हजार गावांमध्ये १६ हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद करेल. हा उपक्रम रविवार, २८ मे रोजी पूर्ण होईल. तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल, असे डॉ. कुटे यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद करतील. त्याचदिवशी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील, असेही ते म्हणाले.