मुंबई : राज्य विधानसभेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ निलंबित विधानसभा सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची सरकारने तयारी दाखवली असली तरी विरोधी पक्ष आपल्या संघर्षयात्रेवर ठाम असून येत्या बुधवारपासून तिला सुरूवात होत आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी हा या संघर्षयात्रेचा मुख्य हेतू आहे. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संघर्षयात्रेला बुधवारी, 29 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यातून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधून ही संघर्षयात्रा प्रवास करणार असून चार एप्रिलला पनवेलला या यात्रेचा समारोप होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एआयएमआयएम, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या वतीने ही संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टी व शिवसेना युती सरकारला शेतकऱ्यांची आत्महत्त्या रोखण्यात आलेले अपयश, कर्जमाफीसाठी केला जाणारा वेळकाढूपणा आणि कर्जमाफीसाठी विधानसभेत संघर्ष करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन आदींचा निषेध या यात्रेतून केला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचाही या यात्रेचा उद्द्येश आहे. विरोधी पक्षांचे राज्यातील सर्व प्रमुख नेते व आमदार यामध्ये सहभागी होणार आहेत.