संघर्षानंतर अखेर सायकल मुख्यमंत्री अखिलेशकडेच!

0

नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून समाजवादी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात अखेर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंग यादव यांना जोरदार धक्का देत पक्षासह पक्षाचे चिन्ह असणार्‍या सायकलवर ताबा मिळवला आहे.

समाजवादी पक्षाचे चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांचा दावा होता. यावर निर्णय देताना निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता समाजवादी पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह अखिलेश यादव यांना मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मुलायम सिंह यादव यांना मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पक्षातल्या लढाईत मुलाने बापावर निर्णायक विजय मिळवल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.

मुलाविरूध्द मुलायम मैदानात?
निवडणूक आयोगाने आपला निर्णय देण्याआधीच सोमवारी सकाळी मुलायमसिंग यादव यांनी अखिलेश यांच्याविरूध्द कडक धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत दिले होते. समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुलायमसिंह यादव यांनी अखिलेशवर हल्लाबोल केला. मी नेहमी मुस्लिमांच्या हिताची चर्चा केली. मी एका मुस्लिम व्यक्तीला उत्तर प्रदेश राज्याचे पोलीस महासंचालक करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अखिलेशने याला विरोध केला व 15 दिवस माझ्याशी बोलला नाही. राज्याच्या प्रमुखपदी मुस्लिम व्यक्ती बसतेय याला अखिलेशचा विरोध होता. यातूनच अखिलेश हा मुस्लिमविरोधी असल्याचे मला जाणवले, असे मुलायम म्हणाले. अखिलेश हा रामगोपाल यादवच्या इशार्‍यावर काम करीत आहे. मी मुस्लिमांच्या हिताच्या आड येणार्‍या विरोधात लढेन, त्यांच्यासाठी मरायलाही मागेपुढे पाहणार नाही. जर अखिलेशने मुस्लिमांबद्दचा दृष्टिकोन बदलला नाही तर मी अखिलेशविरोधात निवडणूक लढेन, असे मुलायम यांनी स्पष्ट केले.