पुणे । सुखी, संपन्न आयुष्य जगत असताना समाजातील गरीब, दुर्लक्षित घटकाला या सधन समाजाकडून मदत का मिळत नाही, हा प्रश्न पडतो. समाज घडविणार्या हातांचा आज सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडे पाहिले तर, परिस्थिती प्रतिकुल असली तरी त्याचे अनुकुलतेत रुपांतर करण्यासाठी संघर्ष आणि कामात सातत्य ठेवल्यास परिस्थिती बदलू शकते, याचा प्रत्यय येतो, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख यांनी रविवारी व्यक्त केले.
दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येणारा दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार यंदा डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांना मोफत संगणक सेवा आणि वाचनालय सेवा उपलब्ध करून देणारे तसेच महाराष्ट्रातील सर्व गावांची परिपूर्ण माहती संकलीत करणारे गाव-की चे संस्थापक प्रदीप लोखंडे यांना प्रदान करण्यात आला. देशमुख यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, अमर राजपूत-परदेशी, सचिव डॉ. राजेंद्र भवाळकर, खजिनदार विक्रम जाधव मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ठ खेळाडू निर्माण करणारे क्रीडा प्रशिक्षक हर्षल निकम, गरीब विद्यार्थींनीच्या सैनिकी शाळेचे शुल्क भरून सामजिक जाणीव जागृत ठेवणारे रवी गायकवाड आणि इजिप्तमध्ये होणार्या तायक्वोंदो स्पर्धेत महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून निवड झालेल्या अभिजीत खोपडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी प्रास्ताविक तर परशुराम शेलार यांनी आभार मानले.