संघर्ष यात्रेसाठी नेत्यांनी भाया सावरल्या

0

मुंबई । आता सरकारविरोधी वातावरण अधिक तापवण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाया सावरल्या आहेत. कोकणात संघर्ष यात्रेचा चौथा टप्प्या सुरू होतो आहे. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक होणार आहेत. भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचे आयतेच खाद्य विरोधकांना मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमुक्तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेली संघर्ष यात्रा अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.

अजित पवार वचपा काढतील
दोन वर्षापूर्वी धरणातील पाण्याबाबत अजित पवार यांनी जाहीर सभेत एक वक्तव्य केले होते. दानवे यांच्या वक्तव्यावर सारवासारव करताना भाजप मार्फत सोशल मिडीयावर पवार यांच्या वक्तव्याचा दाखला देत आहेत. त्यामुळे अजित पवार आता भाजप दानवे यांचा शेलक्या भाषेत समाचार घेतील, अशी चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा येत्या 17 मे पासून कोकणात सुरू होत असून त्याचा समारोप 18 मे रोजी होणार आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्षात नाराज आहेत. ज्या यात्रेत संघर्ष नाही, त्यात सहभागी होवून काय उपयोग, असा सवाल राणे यांनी गेल्या आठवडयात माध्यमांशी बोलताना केला होता. कोकणात सुरू होणार्‍या संघर्ष यात्रेकडे ते पाठ फिरवतील असे मानण्यात येते.

राणे कुटुंबाबाबतच्या वावडया शांत होतील
सिंधुदुर्ग जिल्हयातील संघर्ष यात्रेसाठी राणे पुत्र आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत नितेश यांनी माध्यमांकडे आपले मत व्यक्त केले आहे. नितेश यांच्या सहभागामुळे राणे कुटुंबातील काँग्रेसबाबातच्या वावडया शांत होतील असे जानकारांचे मत आहे. मात्र या संघर्ष यात्रेत नारायण राणे सहभागी होणार किंवा नाहीत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघर्ष यात्रेची सुरूवात 17 मे राजी रायगडावरून सुरू होईल. त्यानंतर रत्नागिरी जिल्हयातून यात्रा पुढे सिंधुदुर्ग जिल्हयात जाणार असून राणे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कणकवलीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 18 मे रोजी यात्रेचा समारोप बांदा येथे जाहीर सभेने होईल.

सरकार बळाचा वापर करते आहे
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ संवैधानिक अधिकारांचा वापर करून लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलांना पोलीसी बळाचा वापर करून तुरुंगात डांबणे म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सरकारने राज्यात अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली आहे. सत्तेचा आणि पोलीसी बळाचा गैरवापर करून सरकार आणि भाजपविरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊन उपोषण करणार्‍या मानस पगार, हनुमंत पवार, अक्षय पुराणिक, मयुर लाटे यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना पोलीसी बळाचा वापर करून उपोषणस्थळावरून उचलून पोलीस ठाण्यात डांबण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता पोलीस काहीही माहिती द्यायला तयार नाहीत. सत्तेचा आणि पोलीस बळाचा वापर करून संवैधानिक मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकरी पुत्रांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावरून भाजप सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरु झाल्याचे दिसून येते, असे अशोक चव्हाण म्हणाले. उस्मानाबाद येथे मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीची मागणी करणार्‍या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याच्या प्रकाराचाही अशोक चव्हाण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.