संघाची हत्यारे जप्त करा; अन्यथा देशात मोठा नरसंहार होईल – प्रकाश आंबेडकर

0

मुंबई : सामान्य माणसांना मिळू शकत नाहीत, अशी हत्यारे संघाकडे आहेत. आर्म्स अॅक्ट अंतर्गत सामान्य माणूस पोलिसांच्या परवानगीने फक्त पिस्तूल बाळगू शकतो. संघाकडे स्वयंचलित बंदुका, डबल बॅरल फायर सारखी अत्याधुनिक हत्यारे आली कुठून? ज्या ज्या ठिकाणी संघाचे कार्यालय आहेत, तिथे तिथे ही हत्यारे आहेत. ही हत्यारे कुणाविरुद्ध वापरली जाणार आहेत? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी या हत्याराच्या विरोधात कारवाई केली नाही. आताचे सरकारही यावर कारवाई करत नाही, संघाची हत्यारे जप्त केली नाहीत तर सत्तेतून पायउतार होताना संघाकडून मोठा नरसंहार होण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेली शस्त्र जप्त करण्यात यावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप बहुजन महासंघ पक्षाच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आंदोलन करण्यात आले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संघाने आपली वेगळी सेना का तयार केली आहे? तसेच या सेनेकडे शस्त्र का आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शस्त्रांची पूजा कशी काय करतात? पोलिसांनी खबरदारी घेत यावर कारवाई करायला हवी. सत्ता गेली तर ही हत्यारे पोलिसांवरच रोखली जातील. सरसंघचालक मोहन भागवत आणि संघावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी, जर संघाने जमा केलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून मोर्चा काढू,असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.