भोपाळ: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. सत्तेत आल्यास सरकारी कार्यालयांमधील शाखांवर बंदी घालू, असे कॉंग्रेसने जाहीरनाम्यातून आश्वासन दिले आहे. यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि सरकारी कर्मचारीदेखील शाखांमध्ये सहभागी होतील. यावर कोणीही बंदी आणू शकत नाही, असे शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितले आहे.
मध्यप्रदेशात सत्तांतर झाल्यास सरकारी जागांवर भरणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालू, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंह यांनी सोमवारी भाषण केलं. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,’ असे शिवराज सिंह यांनी म्हटले आहे.