संघ निवड पक्षपाती राजकारणाला कंटाळून कुशल म्हात्रेचा कबड्डीला रामराम?

0

ठाणे । सांगली वाळवा येथे 25 व 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या कुमार कुमारी गटातील राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्राचा कुमार व कुमारी गटाचा संघ निवडण्यात आला. यात ठाणे जिल्ह्याच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, ठाणे जिल्ह्याकडून कुशल म्हात्रे या खेळाडूने सर्वोत्कृष्ट खेळ केला. मात्र, त्याचीच महाराष्ट्रच्या संघात निवड करण्यात आली नाही.तर त्याऐवजी कमी क्षमतेचा खेळ ठाणे जिल्ह्यातील संघाच्याच खेळाडूची निवड करण्यात आली.कुशल म्हात्रेने संपूर्ण स्पर्धेत 50 पेक्षा गुण मिळवल्याचा दावा केला आहे, तर निवड झालेल्या दुसर्‍या खेळाडूने कुशलपेक्षा कमी गुण मिळवलेले असताना कुशल याला राज्य संघाच्या निवड चाचणीत डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एका संघातच पक्षपातीपणा का? यात कुठे आर्थिक संबंध येऊन घोडेबाजार तर झाला नाही ना? असे प्रश्‍न कुशल म्हात्रे प्रतिनिधीत्व करत असलेल्या एकविरा क्रीडा मंडळाचे संस्थापक देवा म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. या अन्याययविरोधात लढणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत कुशल नवीमुंबई नेरुळ येथील एकविरा क्रीडा मंडळाकडून खेळला होता.या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने ठाणे जिल्ह्याच्या संघात स्थान मिळवले होते. राज्य अजिंक्यपद स्पर्धेतही चांगला खेळ केल्यामुळे कुशल नक्की महाराष्ट्राच्या संघात जागा मिळवेल अशी आशा सर्वजण व्यक्त करत होते. बीड, रायगड,औरंगाबाद या संघांविरुद्ध कुशलने एकहाती खेळ करत या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याला विजय मिळवून दिला. मात्र उपांत्यपूर्व फेरीतील रत्नागिरीविरुद्धच्या सामन्यात कुशलच्या पायाला दुखापत झाली आणि संघाबाहेर जावे लागले. कुशलच्या गैरहजरीचा फायदा उचलत रत्नागिरी संघानेे ठाणे जिल्ह्यावर विजय मिळवला. ठाणे जिल्हा संघाचा पराभव होऊनसुद्धा चर्चा मात्र कुशल म्हात्रेच्याच खेळाची झाली. इतके असतानाही मात्र संघ निवडीची वेळ आली त्यावेळी त्याच्यापेक्षाही सुमार दर्जाचा खेळ केलेल्या खेळाडूची वर्णी महाराष्ट्राच्या संघात लागली.

माहिती अधिकाराचा वापर करणार
कुशल सारखे अनेक खेळाडू आहेत त्यांच्यावर पक्षपातीपणामुळे खेळ अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे खेळात तरी राजकारण आणू नका याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर होऊन चांगला खेळाडू खेळायचे सोडून देऊ शकतो. कुशलवर झालेल्या अन्यायाविरोधात लढणार असून माहिती अधिकार कायद्याचा आधार घेत लढणार असल्याचे एकवीरा संघाचे संस्थापक देवा म्हात्रे यांनी सांगितले आहे.

संघाच्या आवश्यकतेनुसार निवड
दरम्यान ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव शशिकांत ठाकूर यांनी कुशल म्हात्रेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. वाळवा येथील राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या संभाव्य संघात ठाणे जिल्ह्याचे पाच खेळाडू निवडण्यात आले होते. ठाणे जिल्ह्याचा संघ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे संघातील केवळ एकच खेळाडू राज्य संघात निवडला जाणार याची जाणिव होती. राज्य संघाच्या अंतिम निवड प्रकियेत संघाला डाव कोपर्‍यात खेळणार्‍या खेळाडूची आवश्यकता होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा डाव कोपरारक्षक आणि नवी मुंबईतील संघातून खेळणार्‍या तेजस कदमची निवड करण्यात आली. कुशल म्हात्रेला सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळेही त्याला अंतिम संघात निवडताना विचार झाला नसावा, असे ठाकूर यांनी सांगितले.