मुंबई: केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा केला आहे. आता एनपीआरला ही मंजुरी दिली आहे. हा कायदा अल्पसंख्यांक विरोधी तर आहेच सोबतच हा कायदा ४० टक्के हिंदू विरोधी असल्याचे सांगत हा कायदा आणून भाजप आरएसएस देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे घणाघाती आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले. आज गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकत्व कायद्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारला लक्ष केले.
देशात अनेक नागरिकांकडे पुरावा नाही, त्यांच्यावर हा अन्याय होणार असून मताच्या राजकारणासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याकांचे मत कमी करून भाजप कायम सत्तेत राहण्याचा विचार करत असल्याचेही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी ब्लॅकमेलर
प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्च्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर देखील घणाघाती आरोप केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतात मात्र दुर्दैवाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले हे ब्लॅकमेलर आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने जर अल्पसंख्यांक, बहुजनांना न्याय दिला असता तर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसते असे आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केले.