कन्नूर : केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि येथील परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावे आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. केरळमध्ये रा. स्व. संघाचा स्वयंसेवक राजेश याची गेल्या आठवड्यात हत्या झाली होती. जेटली यांनी राजेशच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. केरळात जेव्हा माकपच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडी सत्तेवर येते तेव्हा अशा हत्या सुरु होतात. भाजपशासित राज्यात असा प्रकार घडला असता तर आतापर्यंत पुरस्कारवापसी सुरु झाली असती, असा टोलाही त्यांनी डाव्यांना लगावला.
राष्ट्रपती राजवटीची संघाची मागणी
या दौर्यात केरळमधील राजकीय वातावरणाची माहिती अरूण जेटली यांनी घेतली. अनेक वर्षांपासून सीपीएम आणि भाजप यांच्यात केरळमध्ये संघर्ष सुरू आहे. येथे भाजपची ताकद वाढविण्यासाठी काय करता येईल याचा आढावा जेटली यांनी घेतला. गेल्या काही महिन्यांमध्ये केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून, केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरही अरूण जेटली यांच्या केरळ दौर्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संघ कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप आणि डावे यांच्यात केरळात वाद रंगला आहे.
जेटलींना दु:ख केवळ संघाच्या कार्यकर्त्यांचे!
मागील आठवड्यात संघ कार्यकर्ता राजेश याची हत्या झाली होती. तर काही दिवसांपूर्वी राजकीय हिंसेदरम्यान मारल्या गेलेल्या 21 जणांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी राजभवनाबाहेर सत्याग्रहही केला. राज्यात घडलेल्या घटनांमध्ये मारले गेलेल्यांचे हे नातेवाईक आहेत. दरम्यान, जेटली यांच्या केरळ दौर्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सीपीएमचे नेते अन्नावूर नागप्पन म्हणाले, राज्यात हिंसाचाराच्या घटनेत सीपीएमचा हात आहे, असा अपप्राचार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केला जात आहे. अर्थमंत्री अरूण जेटली हे फक्त संघ कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाना भेटले, ज्या डाव्या कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबांना जेटली भेटायला का गेले नाहीत? असा प्रश्नही नागप्पन यांनी उपस्थित केला आहे.