पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश !
मुक्ताईनगर : कोरोना पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या संचारबंदीने रावेर लोकसभा क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. केळी हे नाशवंत फळ असल्याने लाखो रुपयांची केळी पिाची राखरांगोळी डोळ्यांदेखत होणार असल्याने शेतकर्यांनी रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी व मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केळी फळाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळून निर्यातीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. दोघेही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकर्यांची कैफियत मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याने शेतकर्यांबाबतीत संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच पंजाब, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने केळी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आमदारांना घातले होते साकडे
केळी उत्पादक शेतकर्यांनी आमदार पाटील यांना दोन दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानुसार सध्या जगभरात थैमान घालणार्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे संचारबंदी व तत्सम निर्णय घेण्यात येत आहेत मात्र दीड वर्ष संगोपन केलेली केळी कापणी ठप्प झाल्यामुळे जिल्ह्यातील केळीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत होती. अत्यावश्यक सेवा म्हणून केळी कापणीला व वाहतुकीला प्रशासनाने परवानगी द्यावी कारण सध्या विष्व महामारीमुळे केळी कापणी जवळपास बंद च पडलेली आहे. केळी हे नाशवंत फळ असल्यामुळे शेकडो हेक्टर केळी बागेतच पिकून सडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे त्यामुळे या मागणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होती. या निवेदनावर सुधीर तराळ, ईश्वर रहाणे, बाळू पाटील, विनायक पाटील, डी.व्ही.पाटील, सुभाष धनगर, सुभाष पाटील (टेलर), रवींद्र पाटील, सुधाकर चोपडे, गोकुळ पाटील, भागवत पाटील, अतुल पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.