कोंढवा : महाविद्यालयाच्या दोन व्यवस्थापकीय संचालकांच्या त्रासाला कंटाळून वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील के. एन. महाविद्यालयातील प्राचार्याने पुण्यातील राहत्या घरात गळ्फास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री येवलेवाडी येथील मार्व्हल अलबेरो सोसायटीमध्ये ही घटना घडली. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली असून वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
गजानन लक्ष्मीनारायण तेडीवाल (54, रा. येवलेवाडी) असे आत्महत्या केलेल्या प्राचार्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेडीवाल हे कारंजा लाड येथील के.एन. महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा पुण्यात राहण्यास आहेत. मुलगा हिंजवडीतील एका कंपनीमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनियर आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात येवलेवाडी येथे मधील मार्व्हल अलबेरो सोसायटीमध्ये राहण्यास आले होते. बुधवारी मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तेडीवाल यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याने याबाबत कोंढवा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.