संच तीनमधून वीजनिर्मिती सुरू

0

भुसावळ । ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात विजेला मागणी वाढल्याने कार्यान्वित करण्यात आलेला दीपनगरातील 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन सोमवारी रात्री 12 वाजता बंद करण्यात आला होता मात्र गणेशोत्सवामुळे विजेची वाढती मागणी लक्षात घेता हा संच गुरुवारी सकाळी सात वाजता पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी दिली.

दीपनगरच्या तीनही संचातून वीजनिर्मिती
राज्यभरात ऑगस्ट महिन्यातील दुसर्‍या आठवड्यात पाऊस नसल्याने विजेची मागणी वाढली होती. घरगुती, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील विजेचा वापर वाढल्याने दररोज महावितरणला 15 हजार 500 तर राज्याला 19 ते 20 हजार मेगावॅट विजेची गरज भासत होती मध्यंतरी झालेल्या पावसामुळे मागणी कमी झाल्याने कळवा- मुंबई येथील लोड डिस्पॅच सेंटरने दीपनगरातील 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन सोमवारी रात्री 12 वाजता बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र गणेशोत्सवामुळे राज्यात पुन्हा विजेला मागणी वाढल्याने कळवा येथून आदेश प्राप्त झाल्यानंतर संच क्रमांक तीनमधून वीज निर्मितीला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी राज्यात 15 हजार 527 मेगावॅट विजेला मागणी असलीतरी प्रत्यक्षात मात्र 10 हजार 996 मेगावॅट विजेचा पुरवठा झाला. दरम्यान, दीपनगरातीलन संच क्रमांक तीन, चार व पाचमधून गुरुवारी तब्बल 798 मेगावॅट विजेची निर्मिती झाली.