संजयदादा फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

0

शेंदुर्णी । जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे भूषण भावसार यांनी स्वप्रयत्नातून शिकवणी वर्ग रात्र शाळा सुरु केली असून परीसरात या उपक्रमाचे सर्वाकडून कौतुक होत आहे. संजय दादा गरुड फाऊंडेशनने भूषण भावसार यांच्या या ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्याला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप रात्र शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून फाउंडेशनचे संचालक प्राचार्य बी.जी मांडवळे यांनी शेती आणि शिक्षण या मूळ समस्ये वर विचार मांडत शेत मजूराचा मुलगा अधिकारी होणे, यासारखे सार्थक पुण्य आजच्या युगात तुलना करता दुसरे नाही असे मत मांडले.

फाऊंडेशचे उपाध्यक्ष प्राचार्य.डॉ वासुदेव पाटील यांनी आपल्या भाषणातून उदाहरण देतांना सांगितले की पित्याच्या दुर्देवी निधनानंतर तिसर्‍या दिवशी कापुस वेचायला जाणारा किशोरवयीन मुलगा बघितल्यावर मला ग्रामीण भागातील वेदना खर्‍या अर्थाने कळाली असे मत व्यक्त केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष यु.यु. पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षण पोहचविणे गरजवंताला त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचविणे हा ध्यास फाऊंडेशनने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सरपंच विजय भावसार, स्नेहदीप गरुड, सुहास जैन, तडवी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आकार श्री व्ही एस पाटील यांनी मानले.