संजय काकडे यांनी जाहीर माफी मागावी

0

पिंपरी-चिंचवड : बहुमत तर सोडा, अन्य पक्षांची साथ घेऊनही भाजप गुजरातमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही, असे भाकित वर्तविणारे खासदार संजय काकडे तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे त्यांनी भविष्यात अशी बेताल आणि निराधार वक्तव्ये करू नयेत; तसेच त्यांनी भाजपची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

काकडे प्रसिद्धीपिपासू व्यक्ती
याबाबत पत्रकात म्हटले आहे की, काकडे भाजपचे सहयोगी खासदार आहेत. त्यांनी भाजपची प्रतिमा मलीन करण्याचा सातत्याने केविलवाणा प्रयत्न केला आहे; मात्र भाजपचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे. सर्वच पातळ्यांवर भाजपकडून उत्तम कामगिरी होत आहे. मतदारांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच परिपाक म्हणून गुजरात विधानसभेच्या निकालांकडे पाहता येईल. असे असतानाही खासदार काकडे यांच्यासारखे प्रसिध्दीपिपासू बेताल आणि निराधार वक्तव्ये करतात. यातून केवळ भाजपची प्रतिमा मलीन करणे आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. संजय काकडे यांनी यापूर्वीही असाच प्रकार केला होता. मात्र काकडे यांच्या या प्रयत्नांना यश आले नसून, प्रत्येकवेळी काकडे यांचे वक्तव्य फोल ठरत आहे. त्यामुळे भाजपऐवजी काकडे यांचीच प्रतिमा डागाळत असून, त्यांचा हेतू लक्षात येतो.

निलंबन करून हकालपट्टी करावी
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत तर सोडा, अन्य पक्षांची किंवा उमेदवारांची मदत घेऊनही भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही, असे भाकित काकडे यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे निलंबन करून भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी आहे. त्याचबरोबर आपले भाकित फोल ठरल्याने काकडे यांनी जाहीर माफी मागावी, अशीही मागणी थोरात यांनी पत्रकातून केली आहे.