मुंबई । महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन ही शरीरसौष्ठव खेळाची दुसरी संघटना उभारुन सवतासुभा निर्माण करणार्या संजय मोरे यांच्याविरोधात त्यांच्याच मर्जीतल्या संघटकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.
संघटनेला स्वत:ची बटीक करणार्या, शरीरसौष्ठवपटूंचा पदोपदी अपमान करणार्या संजय मोरे यांच्या एककल्ली काराभारला कंटाळून पुणे, जळगाव, नंदूरबार, धुळे, ठाणे, नाशिक, अहमदनगर येथील संघटनेच्या पदाधिकार्यांनी एकत्रितपणे मधुकर तळवळकर, विक्रम राठोेड यांच्या महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे.
या सात जिल्हा संघटनांच्या निर्णयामुळे संजय मोरे यांच्या संघटनेला मोठा हादरा बसला आहे. संजय मोरे यांचा पक्षपाती कारभार, मर्जीतल्या शरीरसौष्ठवपटूंनाच पुरस्कार देणे अशा कार्यपद्धतीमुळे मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने यापूर्वीच बंड केले होते. या सात जिल्हा संघटनांनी महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे संघटनेची ताकद दुपटीने वाढली आहे.
स्पर्धा, चुरस वाढणार
सात जिल्हा संघटनांच्या विलीनीकरणामुळे राज्यात शरीरसौष्ठव स्पर्धांचे प्रमाण वाढणार आहे. याशिवाय या संघटनेतील शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागामुळे यापुढे महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनतर्फे घेण्यात येणार्या राज्य अजिंक्यपद आणि इतर स्पर्धांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळेल. राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद अण्णा चव्हाण आणि मनीष पोकळे आपल्या पुण्यातील सहकार्यांसह दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे शरीरसौष्ठवासाठी आपले आयुष्य वेचणारे नगरचे मधुकर गायकवाडही आता तळवलकर-रोठेंसोबत असतील. या संघटनांसह धुळे,जळगाव, नाशिक आणि नंदुरबारची संपूर्ण संघटक आणि त्यांचे खेळाडू महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनमध्ये विलीन झाले आहेत.
बुलंद शहरातील स्पर्धेत राज्यातील विजेत्यांना रिकामी पाकिटे
1, चार महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या अन्यायाचा पाढा सागर माळी आणि रेणसू चंद्रन या शरीरसौष्ठवपटूंनी वाचला. त्यांनी मोरेंच्या कारभारावरच थेट हल्ला चढवला. बुलंद शहरात आम्हाला पुरस्काराची रिकामी पाकिटे मिळाली.
2 चार महिने झाले तरी अद्याप पैसे मिळालेले नाही. पैसे सोडा, आम्ही स्पर्धेला जेव्हा जेव्हा राज्याबाहेर गेलो, तेव्हा तेव्हा आमच्यावर केवळ अन्यायच झाला आहे. इथे गुणवत्ता पाहून कधीही पुरस्कार दिला जात नाही. पुरस्कार दिला जातो.
3 बॉडी नाही तर ओळख पाहूनच पुरस्कार दिला जातो आणि हे पुरस्कार कोण ठरवतो. हा सारा लाजिरवाणा प्रकार संजय मोरेंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे सुरू आहे. हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे, असे म्हणत सागर माळी आणि रेणसू चंद्रन यांनी मोरेंच्या कारभाराचा पर्दाफाशच केला.