संजय राऊतांविरोधात भाजप आक्रमक; राम कदमांकडून पोलिसात तक्रार !

0

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले आहे. विरोधक भाजपवर आरोप करत असून भाजपकडून शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान काल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असे विधान उदयनराजे भोसले यांच्या संदर्भात केले होते. यावरून आता नवीन वाद सुरु झाला आहे. हा वाद आता थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधील भाजपाचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतरही आमदार राम कदम सकाळपासून घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका राम कदमांनी दिला आहे. त्यामुळे संजय राऊतांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचा भाजपाकडून प्रयत्न होत आहे.

ठिकठिकाणी भाजपकडून संजय राऊत यांचा निषेध सुरु आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी उपोषण सुरु केले आहे. मंगळवेढ्यात राऊतांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरमधल्या संगमनेरमध्येही उदयनराजे समर्थकांनी राऊतांविरोधात निषेध नोंदवला आहे.