संजय लोकरे यांची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत कामगिरी

0

भुसावळ। दीपनगर विद्युत केंद्रातील सुरक्षा विभागातील कनिष्ठ सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे यांनी आंध्रप्रदेशातील कडापा या ठिकाणी पार पडलेल्या 7 व्या राष्ट्रीय फिल्ड आंतरगृह तिरंदाजी चैम्पियान्शीप 2016-17 स्पर्ध्येत सिंगल स्पॉट आणि फाईव्ह स्पॉट प्रकारात दोन कांस पदक मिळविली. तसेच महाराष्ट्र राज्य संघातून सुवर्ण पदक प्राप्त केले. फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएएआय )यांच्या विद्यमाने आंध्रप्रदेश फिल्ड आर्चरी असो. (एपीएफएए) आयोजित राष्ट्रीय स्पर्ध्येत ही चमकदार कामगिरी केली. या यशासाठी मुख्य अभियंता अभय हरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वर्कर्स फेडरेशनच्यावतीने सत्कार
या स्पर्धेआधी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्ध्येमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. तसेच मुंबई महापौर चषक स्पर्ध्येत रौप्य पदकाची कमाई केली होती. दीपनगर परिसरात तिरंदाजीसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दीपनगरच्या स्मशानभूमी परिसरात सराव करावा लागला. सहकारी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी जन्मेजय कळसकर यांनी सरावात मदत केली. व्यवस्थापनाच्यावतीने मुख्य अभियंता अभय हरणे, अधिक्षक अभियंता मनोहर मसराम आणि सुरक्षा विभाग प्रमुख राजेंद्र पवार यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळेच मला ही संधी मिळाली आणि मला पदक मिळाली. या क्षेत्रात तरुणांचा पाहिजे तसा प्रतिसाद नाही. परंतु सुविधा उपलब्ध करून दिल्यास नक्कीच तरुण आकर्षित होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.