संजीवन समाधी सोहळ्याची पालखी सोहळ्याने सुरूवात

0
भुसावळ : श्री ज्ञानेश्‍वर माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळातर्फे श्री ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याला ‘माऊलींच्या समाधीपूर्व दर्शन पालखी’ मिरवणुकीने सोमवारी दुपारी सुरूवात झाली.
शहरातील कोळी समाज मंगल कार्यालयात 14 ते 16 दरम्यान हा सोहळा होत असून मंगळवारी स्वामी विद्यानंद हे भाविकांना ‘ज्ञानदेवांचे हृदस्थ पूजन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सोमवारी गजानन महाराज नगरातून निघालेली पालखी मिरवणूक सोपान कॉलनी, सेवाश्रम, पत्रीशाळा, प्रभात कॉलनी, गणपती मंदीर या मार्गाने निघून पुन्हा मुळस्थळी पोहोचली. ठिकठिकाणी पालखीचे सडा-रांगोळ्या व पूजन करून स्वागत करण्यात आले. बलभद्र भजनी मंडळाच्या महिलांनी अभंग गायन करत लक्ष वेधले. दरम्यान, दररोज सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान अभंग ज्ञानेश्‍वरीचे सामूहिक पारायण, दुपारी 2 ते 5 भजनी मंडळांचे भजन गायन तर सायंकाळी 7 वाजता प.पू. स्वामी विद्यानंद महाराज भाविकांना मार्गदर्शन करतील. लाभ घेण्याचे आयोजकांनी कळवले आहे.