संजू सॅमसनच्या शतकामुळे सराव सामना अनिर्णित

0

कोलकाता । कर्णधार संजू सॅमसनच्या 128 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर बोर्ड प्रेसिडेंट एकादश संघाने पाहुण्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन दिवसीय पहिला सराव सामना अनिर्णित राखला. श्रीलंकेने आपला पहीला डाव नऊ बाद 411 धावांवर घोषीत केला. त्याला उत्तर देताना बोर्ड प्रेसिडेंट एकादश संघ उपाहारापर्यंत 2 बाद 31 धावा असा अडचणित आला होता. त्यानंतर संजू सॅमसनने संयमी खेळी करत संघाचा डाव पाच बाद 287 धावा असा सावरला. भारताच्या डावातील 75 षटकांच्या खेळानंतर दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमी दर्शवली.

सॅमसनने 143 चेंडूच्या आपल्या खेळीत 19 चौकार आणि एक षटकार ठोकला. दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या नमन ओझाच्याजागी सामन्याच्याआधीच संजूची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. संजूने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. डावात तीन उपयुक्त भागिदारी रचत संघाचा डाव पुढे नेला. प्रथम त्याने जीवनज्योत सिंगसह (35) 68 धावा , रोहनप्रेमच्या (39) जोडीने 71 आणि बावंका संदीपबरोबर (33) 85 धावांची भागिदारी रचली.सामन्यात गोलंदाजांना खेळपट्टीकडून थोडीशीही मदत मिळाली नाही. अशापरिस्थितीत श्रीलंकेने आपले 10 गोलंदाज मैदानत उतरवले. त्यात संघाचा विकेटकिपर निरोशन डिक्वेलाचाही समावेश होता. अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने रविवारी मध्यमगती गोलंदाजी केली नाही. दुखापतीमुळे मॅथ्यूजला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती.