संततधार : हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले

0

रावेर तालुक्यातील सुकी नदीला आला पूर ः भुसावळात पावसामुळे गोदामाची भिंत कोसळून वाहनांचे नुकसान

भुसावळ- हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात सातत्याने वाढ सुरू असल्याने गुरुवारी दुपारी एक वाजता धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला तर प्रशासनाने पुराच्या पार्श्‍वभूमीवर नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रातील गोपाळखेडा, लोहारा, देडतलाई, टेक्सा, चिखलदरा व बर्‍हाणपूर आदी सर्व पर्जन्यमापक स्थानकांवर गुरुवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ या 24 तासांमध्ये 453 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर त्यानंतर अवघ्या चार तासात पुन्हा 193 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पावसामुळे भुसावळात गोदामाची भिंत कोसळून दोन वाहनांचे नुकसान झाले तर रावेर तालुक्यात सुकी नदीला पावसाळ्यात प्रथमच पूर आला.

लाभक्षेत्रात पावसाने 41 दरवाजे उघडले
तापी-पूर्णासह धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ सुरू आहे. गुरुवारी सकाळी धरणाच्या 36 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता दुपारी एक वाजेच्या सुमारास संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून प्रति सेकंद तीन 995 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून धरणाची जलपातळी 206.100 मीटर तर धरणात 26.27 200 टक्के (क्यूमेक्स) जलसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात दुसर्‍यांदा पूर्णपणे उघडले दरवाजे
धरणावरील सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात दुसर्‍यांदा धरणाचे पूर्णपणे दरवाजे उघडण्यात आले. यापूर्वी 29 जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले होते तर 24 तासानंतर ते बंद करण्यात आले.

भुसावळात संततधारमुळे जनजीवन विस्कळीत
भुसावळ बुधवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस गुरुवारीदेखील कायम होता. संततधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने पादचार्‍यांसह वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले शिवाय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील रस्ते आधीच मरणासन्न अवस्थेत असताना पालिकेकडून साधी डागडूजी न झाल्याने रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला.

भुसावळात गोदामाची भिंत कोसळून वाहनाचे नुकसान
भुसावळ- शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील मोठ्या मशिदीजवळील राजेंद्र रोडवरील खालम्मा पुलाशेजारी एका बंद असलेल्या पडाऊ गोदामाची भिंत कोसळल्याने दोन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

संततधार पावसाने कोसळली भिंत
इंदरचंद चोरडिया यांच्या मालकीची जागा असलेल्या व सध्या स्वरूपचंद केवलचंद चोरडिया, सुगनचंद चोरडिया वगैरे यांनी आपल्या गोडावूनसाठी अनेक वर्षापूर्वी घेतलेली गोदामाची भिंत अचानक भिंतीशेजारी उभ्या असलेल्या चारचाकी बोलेरो मालवाहू गाडी (क्र.एम.एच.19 बी.एम.3749)व अन्य एका दुचाकी वाहनावर कोसळली. यात बोलेरो वाहनाचे सुमारे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले. घटनास्थळी तत्काळ रक्षा सुरक्षा एजन्सीचे संचालक विनोद शर्मा, सुनील ठाकूर, आशिष पॉल, गोकुळ खंबायत, सचिन हेडा, अशोक भराडे, शब्बीर तडवी आदींनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले.

रावेर तालुक्यात सुकी नदीला मोठा पूर
रावेर-
तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस कायम असल्याने नदी नाल्यांसह
शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसाच्या परीस्थितीवर तहसीलदार उषाराणी देवगुणे लक्ष ठेवून आहेत. बुधवारपासूनच्या पावसामुळे सुकी नदीला पूर आला असून भोकर, नागोई, मात्राण नदीसह रावेर शहरातून वाहणार्‍या नागझिरीतदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून मंगळूर धरण अर्धा मीटर तर सुकी धरण एक मीटरने खाली असून कोणत्याही क्षणी ते भरले जाणार असल्याचे मध्यम प्रकल्प विभागाचे महेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रावेर शहरातील सरदार जी.जी.हायस्कूल, यशवंत विद्यालयासोबत अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.