संतप्त नांद्रा ग्रामस्थांचा घेराव

0

जळगाव । नांद्रा बु. (ता. जि. जळगाव) या गावात असलेले सरकारमान्य देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी येथील महिलांनी राज्य अधीक्षक उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना घेराव घातला. अनेक दिवसापासून ग्रामस्थांकडून मागणी करूनदेखील मद्यविक्रीचे दुकान हटविले न गेल्याने ग्रामस्थांनी राज्य शुल्क उत्पादन अधिकार्‍यांचे कार्यालय गाठले होते. ग्रामस्थांनी समस्या मांडत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.

महिलांनाच मोठा त्रास
या देशी दारू दुकानामुळे गावातील तरुण आणि वयस्कर माणसे मोठ्या प्रमाणात मद्यपानाच्या आहारी जात असून व्यसनाधिन झाले आहेत त्यामुळे गावात व कुटुंबात नेहमीच भांडणाचे प्रकार होत आहे. शेतात दिवसभर कष्ट करून घरी आल्यावर महिलांना त्रास दिला जात आहे. बर्‍याच जणाचे दारू पिऊन संसार उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे विधवा महिलांचा आणि लहान मुलांचा सांभाळ करण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कर्जबाजारीपणा वाढला
दारुच्या आहारी गेलेले कर्ते पुरुष आळस व खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागून कर्जबाजारी होत आहेत. दारुसाठी पैसा खर्च होणे सुरुच राहून अन्य सांसारिक जबाबदार्‍यांसाठीही उत्पन्न पुरेसे पडत नसल्याने कर्जबाजारीपणा वाढला आहे. अनेकांचे केवळ निष्काळजीपणा व बडेजावामुळे पुर्वीच्या तुलनेत उत्पन्न घटले आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या लोकांचे मुलांचे शिक्षण व कुटुंबियांच्या आजारपणाकडेही दुर्लक्ष होते आहे. त्यातून ते दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहेत. या परिस्थितीचा फायदा उचलत काही स्वार्थी लोकांनी अवैध सावकारीचा व्यवसाय सुरु केला आहे. या अवैध सावकारी करणार्‍या लोकांना राजकीय लोकांकडून संरक्षण मिळत असल्याने त्यांचे धाडस वाढलेले आहे.

जिल्हा प्रशासनाला दखल घ्यावी लागेल
नांद्रा येथून थेट जळगावात येऊन राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांना घेराव घालण्याच्या विचारात आलेल्या या ग्रामस्थांच्या मनस्थितीचा विचार जिल्हा प्रशासनाने केलाच पाहिजे, असे मत सामाजिक संघटनानी व्यक्त केले आहे. एका अर्थाने स्थानिक महसूली अधिकारी व पोलिसांवर विश्‍वास राहिला नसल्याचा अर्थ नांद्राच्या ग्रामस्थाच्या या भूमिकेतून काढायचा का? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीने दारुबंदी विरोधात ठराव मंजूर केल्यावर थेट मतदानाने या संदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबादार महसूल प्रशासनानकडे देणारा कायदा अस्तित्वात असतांना या प्रक्रियेचा विचार आपल्याला न्याय मिळवून देणार नाही, असे जर या ग्रमास्थांना वाटत असेल तर ते जिल्हाधिकार्‍यांनाच आव्हान आहे.

मद्यपान करणार्‍यांची संख्या मोठी
देशी दारूच्या दुकानावर मद्यपान करणार्‍याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने गावच उद्ध्वस्त होण्याची पाळी आली आहे. तरुणांची संख्यादेखील अधिक प्रमाणात आहे. देशीदारूचे दुकान गावातच असल्याने मुख्य मार्गावर मद्यपान केलेल्यांकडून मुली व महिलांची छेड काढण्याचे प्रकार सध्या सुरु असल्याचे घेरावात सहभागी महिलांनी अधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे त्वरित दारूबंदची मागणी महिलांनी केली आहे.