भुसावळ । सध्या उन्हामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अशा स्थितीत भारनियमनात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवत आहे. वेळेवर विज बिल भरुनही वारंवार विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून या निषेधार्थ शहरातील सोमेश्वर नगरात शनिवार 29 रोजी वीज बिलाची होळी करण्यात आली.
विद्युत उपकरणांचे होते नुकसान
शांतीनगर परिसरातील सोमेश्वर नगरातील रहिवासी वेळेवर विज बिल भरुन देखील ऐन उन्हाळ्यात सात तासांचे भारनियमन होत आहे. यामुळे महिलावर्ग व अबालवृध्दांना असह्य उकाडा जाणवत आहे. याचबरोबर दिवसभरात 10 ते 15 मिनीटांचे विजेचे लपंडाव सुरुच असतात यामुळे घरातील विद्युत उपकरणे जळून ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत रहिवाशांनी विज वितरणच्या अधिकार्यांना वारंवार तक्रारी करुन देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शांतीनगर परिसरातील सोमेश्वर नगरातील रहिवाशांनी विज बिलांची होळी केली. तसेच विज बिल न भरण्याचा पवित्रा घेतला आहे.