भुसावळ। शहरातील नवविकसीत वसाहतींमध्ये नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. या परिसरात नियमितपणे साफसफाई होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचर्याचे ढीग निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या भागात सत्ताधारी नगरसेवकांचे वास्तव्य असूनदेखील साफसफाई केली जात नाही. पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा कुजला असून यातून परिसरात दुर्गंधी फैलावत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चक्क या कचर्यांच्या ढिगाच्या पूजनाचा उपक्रम राबवून आपला रोष व्यक्त केला.
कचरा सडल्याने परिसरात दुर्गंधी
शहरातील धनवर्षा अपार्टमेंट, प्रभात कॉलनी, भालचंद्र नगर, मैनाबाई नगरात कचरा संकलाची व्यवस्था नाही, त्यामुळे नागरिक आपल्या घरातील कचरा गोळा करुन रस्त्याच्या कडेला टाकत असल्यामुळे सडक्या कचर्यामुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला होता.
लवकरच लावणार विल्हेवाट
यावेळी सुरेंद्र चौधरी, महेंद्र बागुल, सुहास दांडगे, डॉ. संदीप पाटील, राजू सर्जेकर, शैलजा कुलकर्णी, डॉ. पवन सरोदे या रहिवाशांनी कचर्याचे पूजन केले असता नगरसेविका पती गिरीश महाजन यांनी भेट देत कचर्याची लवकरच विल्हेवाट लावणार असल्याचे सांगितले.