स्वच्छतेच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजप नगरसेविकेची गिरीश महाजनांकडे तक्रार
जळगाव : फाई मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीने कामबंद केले आहे. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होवून कचराकोंडी झाली आहे. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्रभागातील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. आमच्या घराजवळ कचरा फेकून जातात.तसेच राजीनामा देण्याची देखील मागणी करीत असून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने थेट माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.
मनपाने शहरातील साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे. मात्र मक्तेदाराने गेल्या काही दिवसांपासून कामबंद केले आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापौर भारती सोनवणे यांनी मनपाच्या कायम सफाई कर्मचार्यांच्या माध्यमातून नियोजन केले आहे. दोन दिवसापूर्वी घंटागाड्यांचाही प्रश्न मार्गी लावल्यामुळे काही ठिकाणी काम सुरु झाले असले तरी समाधानकारक सफाई होताना दिसत नाही. मनपात विरोधक असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही आंदोलन केले होते. प्रशासनावर चौफेर टीका होत असतानाच आता तर सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने थेट माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच तक्रार केली असून येत्या दोन दिवसात ते बैठक घेणार असल्याची माहिती नगरसेविकेने दिली.
सत्ताधार्यांमध्ये गटबाजी
शहरात स्वच्छता होत नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपात आंदोलन केले होते. या आंदोलनाला उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासह काही नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.आता तर पून्हा भाजपच्याच नगरसेविकेने माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केल्यामुळे भाजपमधली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.