संतप्त शेतकर्‍यांनी फाडले जिल्हाधिकार्‍यांचे कपडे

0

भोपाळ । महाराष्ट्रातील पुनतांबासारख्या गावातून सुरू झालेल्या शेतकरी संपाला व्याप्त स्वरूप मिळत तो देशभर पसरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील शेतकर्‍यांचा सलग सहाव्या दिवशीही संप सुरूच असताना मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आणि शेतकर्‍यांचा उद्रेक उफाळून बाहेर आला. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत मध्य प्रदेश पोलिसांनी तातडीने कर्फ्यू जाहीर केला. दरम्यान, शेतकर्‍यांच्या भावना तीव्र असल्याने शेतकर्‍यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांवरही हात उचलला. शेतकर्‍यांनी मंदसौरच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना धक्काबुक्की केली, तर जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील कपडेच फाडून टाकले. शेतकर्‍यांचा हा रुद्रावतार पाहून इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

गेली सहा दिवस म्हणजेच 1 जूनपासून राज्यातील शेतकर्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. याबरोबरच उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांनीही संप पुकारत आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनास मंगळवारी हिंसक वळन लागले. त्यानतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. तसेच, काही शेतकर्‍यांच्या अंगावर अद्यापही गोळीबाराचे निशाण आहेत.