सोलापूर : सुखाच्या ओढीने शेकडो किलोमीटरची पायपीट करून ऊन, वारा, पाऊस झेलून पंढरीकडे निघालेल्या संतांचे पालखी सोहळे काल वाखरी मुक्कामी विसावल्यानंतर सोमवारी भूवैकुंठ पंढरपुरी दाखल झाले. पालखी मार्गातील अखेरच्या मुक्कामी आलेल्या संतांसह लाखो वैष्णवांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली होती. आषाढीच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रीदेखील पंढरीत आले होते. पहाटे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा सपत्नीक होणार आहे. आषाढीचा हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी आठ लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूरच्या पुढे आली होती. तर दर्शनासाठी तब्बल 22 तासांहून अधिक वेळ लागत आहे.
भूवैकुंठी वैष्णवांचा महापूर..
काल बाजीराव विहिर येथे भव्य रिंगण सोहळा पार पडल्यानंतर संतांच्या पालख्या वाखरी येथील पालखी तळावर विसावल्या होत्या. आषाढी एकादशीसाठी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वाटचाल करत असलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सोपानकाका, संत गजानन महाराज, संत मुक्ताबाईसह शेकडो संतांचे पालखी सोहळे सोमवारी पंढरीत दाखल झाले. संतभार पंढरीत आल्याने भूवैकुंठी अक्षरशः वैष्णवांचा महापूर आला होता. संतभार पंढरीत आला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 मंत्रीदेखील पंढरीत पोहोचले होते. आषाढी सोहळ्यानिमित्त पहाटे शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्नीक होणार आहे़ तसेच विविध पक्षाच्या नेतेमंडळींनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली असून, ते पंढरीत दाखल झाले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी पददर्शन रांग संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपापासून ते गोपाळपूरच्या पुढे गेली होती. त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल 22 तासांहून जास्त कालावधी लागत होता.