थोपटे आर्टस ठेकेदाराला पावणे सात लाख रुपये दंड
पिंपरी चिंचवड ः वडमुखवाडी येथे महापालिकेतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समूह शिल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या मार्चअखेर समूह शिल्प बसविण्यात येणार आहे. मात्र, समूह शिल्प बसवण्यास विलंब झाल्याने दोन वर्षापासून ठेकेदाराला प्रतिदिन एक हजार रुपये दंड पालिकेने आकारला आहे. वारकरी सांप्रदायाची आळंदी – देहू तिर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत आहेत. राज्य-परराज्यातूनही दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे तुकोबाच्या पालखी मार्गावर संत तुुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती एकत्रित भक्ती-शक्ती शिल्प उभारले आहे. तर माऊलीच्या पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर – संत नामदेव महाराज भेटीचे समूह शिल्प उभारण्यात येत आहे. याशिवाय मोशी चौकाजवळ वारीत सहभागी झालेली वारकरी महिला व बालकाचे छोटेखानी शिल्प उभारण्यात आले आहे.
समूह शिल्पात 26 मूर्तींचा समावेश…
आषाढीवारीला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे महापालिकेच्या हद्दीतून मार्गक्रमण होते. पुण्याकडे प्रस्थान करताना मार्गातील पालखी सोहळ्यातील पहिली आरती वडमुखवाडी येथील ज्ञानेश्वर महाराज धाकट्या पादुका मंदिरात होते. त्यामुळे याठिकाणी असलेल्या विस्तीर्ण दोन एकर जागेवर महापालिकेच्या वतीने चार वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समूह शिल्प साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या समूह शिल्पात एकूण 26 मूर्तींचा समावेश आहे. या शिल्पातील प्रत्येक मूर्तीचे वजन, उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालयाकडून केली जात आहे. सुरुवातीला या समूह शिल्पाकरिता सव्वा कोटींची तरतूद करण्यात आली होती.
नऊ कोटींची तरतूद…
मात्र, कला संचालनालयाच्या अधिकार्यांनी जागेची पाहणी केल्यानंतर, दूर अंतरावरुन या मूर्ती दृष्टीस पडाव्यात, याकरिता यापैकी सहा मूर्तीची उंची 22 फुटांपर्यंत वाढविण्याचे सुचविले. त्यामुळे या शिल्पाचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. आता चौथर्याकरिता 1 कोटी 25 लाख रुपये, मूर्ती तयार करण्यासाठी 6 कोटी 70 लाख रुपये व इतर अशा एकूण 9 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुणे-आळंदी रस्त्यावर हे समूह शिल्प वाय जंक्शनच्या जागेत तयार केले जाणार आहे. या शिल्पासाठी दोन एकर पैकी साठ गुंठे जागा उपलब्ध आहे. त्यामध्ये मूर्तींबरोबरच ऍम्फी थिएटर व गार्डनचा देखील समावेश आहे. दरम्यान, या कामाची मुदत मार्च 2017 मध्ये संपली आहे. त्यानंतर थोपटे आर्टस यांना मुदतवाढ देण्यात आली. तरीही काम अपुर्ण राहिल्याने 1 एप्रिल 2018 पासून प्रतिदिन एक हजार रुपये दंड सुरु असून आतापर्यंत 6 लाख 70 हजार रुपये आकारला आहे.