मुळशीतील जांबे गावाच्या पुढे दोन अज्ञातांनी मोटारीत घुसून प्रकार केल्याचा बनाव उघड
पिंपरी-चिंचवड : प्रेयसीशी विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह आठ महिन्यांच्या बाळाचा खून करणार्या नराधमाला हिंजवडी पोलिसांनी अटक करून अज्ञातांनी खून केल्याचा त्याचा बनावही उघडकीस आणला. अतिशय संतापदायी असलेली ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे गावच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्ती जवळ घडली. लुटीसाठी कोणी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करून जवळचे पन्नास हजारही पळवून नेल्याचे त्याने सुरूवातीला पोलिसांना सांगितले होते. तसेच स्वत:वर वार झाल्याचे भासवून रुग्णालयातही दाखल झाला होता. मात्र बोलण्यातील विसंगतीतून तो बारा तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दत्ता वसंत भोंडवे (वय 30, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे या नराधमाचे नाव आहे. तर खून झालेल्या आई व बाळाचे नाव अश्विनी (वय 25) व मुलगा अनुज (वय 8 महिने) असे आहे.
अशी घडली घटना
नराधम दत्ता याचे एका मुलीशी लग्नाआधीपासून प्रेमसंबध होते. तरीही त्याने अश्विनी हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर प्रेमसंबध सुरू असताना दोघांचा लग्न करण्याचा विचार होता. परंतु, पत्नी अश्विनी संपविल्याशिवाय आपल्याला लग्न करता येणार नाही, असे ठरवून दोघांनी अश्विनी व अनुज या दोघांचा खून कट रचला. त्यासाठी प्रेयसीच्या दोन मित्रांनी दोघांकडून प्रत्येकी पन्नास-पन्नास हजारांची सुपारी घेतली. त्याप्रमाणे सासुरवाडीकडून आपल्या पत्नी आणि मुलासह घराकडे दत्ता निघाला. रात्री नऊच्या सुमारास नेरे येथील कोयते वस्तीजवळ उलटीच्या बहाण्याने त्याने आपली मोटार थांबवली. यावेळी तिथे आलेल्या दोघांनी गाडीत शिरुन आश्विनी यांचा गळा आवळून खून केला. तेव्हा त्यांच्यासोबतचा आठ महिन्यांचा अनुज रडू लागला. यानंतर मारहाण करून त्याचीही हत्या केली. या खून प्रकरणात दत्ता याने गाडीतील रोकड चोरीला गेल्याचा बनाव केला. स्वत: जखमी असल्याचे सांगून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. तसेच लुटीच्या बहाण्याने आपल्या पत्नी व मुलाचा खून अज्ञातांनी केल्याची तक्रार पोलिसांत दिली. परंतु, पोलिसांनी दत्ता याच्याकडे कसून चौकशी केली. यामध्ये त्याच्या जबानीत विसंगती होती. यानंतर त्याच्यावरच लक्ष केल्यावर संपूर्ण घटनाक्रम व कारण स्पष्ट झाले. नंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.
असा रचला बनाव
चिंचवडमधील डांगे चौकात मी शनिवारी आपल्या पत्नी आणि मुलासह सासरी आलो होतो. दिवसभर मला उलट्या आणि जुलाबचा त्रास होत होता. त्यामुळे किरकोळ औषधोपचार करून रात्री साडेआठच्या सुमारास मी पत्नी व मुलासह गावाकडे घरी निघालो होतो. जांबे गावच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्ती जवळ नऊच्या सुमारास मोटार वळली असता मला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे मी मोटार बाजूला घेतली. उलटी झाल्यानंतर चूळ भरत असताना अनोळखी दोन व्यक्ती जबरदस्तीने मोटारीत घुसल्या. नंतर त्यांनी अश्विनीच्या तोंडावर रुमाल टाकून तिचे तोंड दाबले. त्यामुळे श्वास कोंडून तिचा जागीच मृत्यू झाला. आठ महिन्यांच्या अनुजला देखील अमानुषपणे लोकांनी मारले. माझ्या मानेवर चाकू ठेऊन दोघांनी मोटारमध्ये असलेले रोख 50 हजार रुपये, दत्ताच्या गळ्यातील सोन्याची चेन, अश्विनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दोन मोबाईल फोन घेतला. तसेच जाता जाता माझ्यावर चाकूने वार करून दोघेही पळून गेले. हा संपूर्ण प्रकार रात्री नऊ ते दहाच्या सुमारास घडला.
…आणि दत्ता पोपटासारखा बोलू लागला
हातावर वार झाल्याने दत्ता खासगी रुग्णालयात दाखल झाला. नंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे पोलिसांत खळबळ उडाली. यासाठी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मोटारीत बाळासह मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर अधिक माहितीसाठी पोलिसांनी रुग्णालयात जावून दत्ताकडून माहिती घेण्यास सुरूवात केली. मात्र वेळ, जागा, घटनाक्रम, हल्लेखोरांचे वर्णन यामध्ये विसंगती जाणवू लागली. तसेच दत्ताच्या हातावरील जखमाही किरकोळ असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याला ताब्यात घेवून ‘बोलता’ केले असता त्याने पटापट वस्तुस्थिती सांगितली.
लग्नानंतरही बाहेर प्रेमसंबध
चौकशी दरम्यान त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांचा दत्ता यांच्यावरील संशय बळावला. त्याच्याकडे आणखी शिताफीने चौकशी केली असता त्याचे लग्नानंतरही बाहेर प्रेमसंबध होते. या प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी दत्ता याने दोन साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या पत्नी आणि मुलाचा खून केल्याची कबुली दिली. पोपटासारखी दत्ताने माहिती दिल्यावर तात्काळ पोलिसांनी त्याची प्रेयसी व तिच्या दोन मित्रांना अटक केली
पसरणी घाटात झालेल्या खुनाची पुनरावृत्ती !
मागील आठवड्यात औंध येथील नवविवाहित तरुणाचा पुणे-महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात निर्घृण खून करण्यात आला. सुरुवातीला हा खून लुटण्याच्या बहाण्याने करण्यात आल्याचे समोर आले. मात्र हा संपूर्ण बनाव असून हा खून केवळ प्रेमसंबंधातून झाल्याचे वाई पोलिसांनी स्पष्ट केले. नवविवाहित महिलेच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराने आणि महिलेने मिळून या खुनाचा कट रचला होता. त्याच घटनेची या दुहेरी खून प्रकरणात पुनरावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या घटनेत प्रियकरासाठी पत्नीने पतीचा, तर या घटनेमध्ये प्रियसीसाठी पतीने पत्नीचा काटा काढला. त्यामुळे या दोन्ही घटनांची चर्चा होत आहे.
असा केला बनाव
* पत्नीला उलट्या झाल्याने थांबविली मोटार
* चूळ भरत असतानाच आल्या दोन अज्ञात व्यक्ती
* मोटारीत घुसून विवाहितेचे दाबले तोंड
* रडणार्या आठ महिन्यांच्या बाळालाही संपविले
* चाकूचे वार करून पळविले 50 हजार