बीड। काही प्रश्न घेऊन शेतकरी संपावर गेले, त्यांच्याशी काल चर्चा करुन महत्वाचे निर्णय घेतले. शेतकर्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गोपीनाथगडावर केले. गोपीनाथगडावर दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तिसर्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. भाजप नेते यावेळी उपस्थित होते.
80 टक्के शेतकर्यांना लाभ
अल्पभूधारक शेतकर्यांना या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकर्यांना या कर्जमुक्तीचा लाभ होईल. ज्याचे थकीत कर्ज आहे त्यांना त्यातून बाहेर काढण्यात येईल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे मार्गदर्शक दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी गरीबांसाठी सातत्याने संघर्ष केला, त्यांचाच आदर्श घेऊन सरकार काम करीत आहे. गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा दुपटीने अधिकची कर्जमुक्ती आम्ही देणारा आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही घेतलेल्या निर्णयाबाबत काही लोक शंकाकुशंका उपस्थित करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींना शेतकर्यांचा संप मिटू नये, असे वाटत होते. आम्ही शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.