पुणे । देव-देवतांचे संगीतामध्ये मोठे योगदान आहे, आध्यात्माशी जोडलेले हेच संगीत त्या देवांना समर्पित करीत संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांनी आपल्या वादनकलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध संतूरवादक पं.शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन आणि पद्मश्री पं.विजय घाटे यांचे तबलावादन ऐकताना उपस्थितांनी वाद्यांची अनोखी तालयात्रा अनुभविली. वाद्यातून विविध रागांचा वेगळा अंदाज पेश होताच पुणेकरांनी या मनोहारी सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संतूरवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पं.शिवकुमार शर्मा यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये राग यमनने मैफलीला सुरुवात केली. सुरुवातीला झपताल आणि त्यानंतर एकतालामध्ये सादरीकरण झाले. संतूरवादनाला पं.विजय घाटे यांची तबल्याची साथ मिळाली आणि मैफलीत रंग भरत गेले. संतूर आणि तबला या दोन वाद्यांतून निघणारे संगीत उपस्थितांचे मनाला मोहणारे होते. एकाच व्यासपीठावर हे दोन दिग्गजांचे सादरीकरण पर्वणी ठरली.
मैफलीच्या उत्तरार्धात उपशास्त्रीय संगीताचा वेगळा अंदाज रसिकांनी वादनातून अनुभविला. कंसध्वनी मिश्र रागातील दादरा तालातील पेशकश आणि तीनतालातील दृत वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. संतूर वादनातून निघणारा मंजूळ ध्वनी आणि तबला वादनाने मिळणारी दमदार साथ यामुळे उत्तरोत्तर मैफल रंगत गेली. दिलीप काळे यांनी साथसंगत केली.