संत ज्ञानेश्‍वरांचे वैश्‍विक तत्त्वज्ञान जगासमोर मांडायचा प्रयत्न

0

पुणे (राजेंद्र पंढरपुरे)। संत ज्ञानेश्वर यांचे वैश्विक तत्त्वज्ञान जगासमोर मांडायचा माझा प्रयत्न आहे, असे विश्‍वशांती केंद्र आणि माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ.वि.दा. कराड यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.

तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माउली जागतिक शांतता पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी (दि.14) होणार आहे. यानिमित्त कराड यांनी आपली भूमिका विशद केली. जागतिक पातळीवर अनेक तत्त्वज्ञ यांची नावे घेतली जातात, पण त्यात भारतीय तत्त्वज्ञ एकही नाही? असा प्रश्‍न नेहमी मला पडायचा. खरे तर संत हे तत्त्वज्ञ असतात असे माझे मत आहे. आणि भारतीय संतांनी कित्येक वर्षांपूर्वीच विश्वाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या लिखाणात कुठेही जात, प्रांत, धर्म, राष्ट्र या कशाचाही उल्लेख नाही. त्यांनी फक्त विश्वाचा विचार केला. त्यांचे हे कार्य कितीतरी अजोड आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ही संतमंडळी तत्त्वज्ञ होती, त्यांच्या नावाच्या पुरस्काराने भारतीय तत्त्वज्ञान जे वैश्विक संकल्पना मांडते ते जगासमोर यावे, असा प्रयत्न राहणार आहे आणि एक ना एक दिवस जगाला हे पटेल असा माझा विश्वास आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले.अध्यात्म म्हणजे धार्मिकता, अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा असे समजण्यात गफलत होत आहे. योग आणि ओम आपण धार्मिक मानले, खरे तर हे ज्ञान विज्ञान आहे. ज्ञानमयोसी, विज्ञानमयोसी असे आपले पूर्वज म्हणत आले. भारतीय शिक्षणपद्धती वैश्विक विचार मांडणारी, ज्ञान देणारी होती, वेदावर आधारित होती.

इंग्रजांनी ती मोडून काढली आपण पुन्हा शिक्षणाला अध्यात्माची जोड द्यायला हवी, असे प्रतिपादन कराड यांनी केले. फक्त माहितीचे संकलन म्हणजे ज्ञान नाही आणि विद्यापीठाचे ते काम नाही तर संकलित होणार्‍या माहितीतून समाजाला शहाणपण शिकवणे, हे उद्दिष्ट असायला हवे संतांदिकांनी हेच कार्य केले या मुद्यावर कराड यांनी मुलाखतीत भर दिला.